नालासोपारा : विरारच्या अर्नाळा नावापूर येथील 'सेवन सी' रिसॉर्ट पहाटे पावणे चार वाजता वसई-विरार महानगरपालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केले. पर्यटकाला केलेली मारहाणही 'सेवन सी' रिसॉर्टला महागात पडली आहे. या कारवाईने अनधिकृत रिसॉर्टचालकांचे धाबे दणाणले असून पर्यटकांना जमाव करून 'मारहाण कराल तर खबरदार ...' हे या राज्यात कदापी खपवून घेतल जाणार नाही असा सज्जड दम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसॉर्टचालकांना दिला आहे.
ठाणे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे सुपुत्र मिलिंद मोरे हे नवापूरच्या सेवन सी रिसॉर्टमध्ये पिकनिक साठी आले होते. त्यावेळी रिक्षाचालक आणि मोरे कुटुंबीयांमध्ये बाचाबाची झाली. रिसॉर्टमधील सर्व कर्मचार्यांनी मिळून मोरे कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर मिलिंद हे उभ्या उभ्या जमिनीवर कोसळले. त्यांना तेथे असलेल्या रिसॉर्टच्या लोकांनी रुगणालयात नेले आणि दरम्यानच्या काळात मिलिंद यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतल्यानंतर सोमवारी दुपारपासून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली ती मंगळवारी पहाटे पावणे चार वाजता संपली. सेव्हन सी रिसॉर्टमध्ये झालेल्या या घटनेमुळे अनधिकृत रिसॉर्टचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जेवढे रिसॉर्ट अनधिकृत असतील त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
रविवारी झालेल्या हाणामारीमध्ये शिवसेना नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याने या संपूर्ण मुद्द्याला राजकीय वळण लागलं आहे. तसंच या घटनेनंतर 24 तासाच्या आतच मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्याने नवापूर येथील सेवन सी रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली आहे. अर्नाळा, नवापूर, राजोडी, कळंब या परिसरात शासकीय जागेवर अनेक अनधिकृत बांधकामे आणि रिसॉर्ट आहेत त्यांच्या स्थानिक नागरीकांनी तक्रारी सुद्धा केल्या आहेत मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई का केली जात नाही. असा आरोप नागरिकांनी केला आहे.
आजपर्यंत वसई तालुक्यातील रिसॉर्टमध्ये अनेकांचे बळी गेले आहेत, त्यांच्यावरसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारवाई करतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आम्हाला कोणतीही नोटीस न देता ही कारवाई केली आहे. आम्हाला वेळ दिला नाही. आमचे 5 करोडच नुकसान झाले आहे. जर आमची नुकसानभरपाई न दिल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर सामूहिकरीत्या आत्महत्या करू अस सेव्हन सी च्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत कामण,पेल्हार, उमर कंपाऊंड या भागात अनेक अनधिकृत बांधकामे झपाट्याने वाढत आहेत. त्यामध्ये राहण्यासाठी मध्यमवर्गीय लोक घरे घेत असल्याने त्याचं नुकसान होत आहे. पालिकेने जर अनधिकृत बांधकामे रोखल्यास ते वाढणार नाहीत तसेच गोरगरीब जनतेची फसवणूक होणार नाही. ज्या अधिकार्याच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामे होत असतील त्यांना निलंबित करावे अशी मागणी होत आहे. दरम्यान वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस उपायुक्त, महसूल अधिकार्यांनी या कारवाई बाबत मौन पाळले आहे. त्यामुळे पहाटे पर्यंत चालेलेल्या कारवाई बाबत बोलण्याचे टाळले आहे.