डोंबिवली : गुजरातहून आणलेला गांजा गुप्त मार्गाने कल्याण-डोंबिवलीत पसरविण्याचा मनसुबा सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी उधळून लावला आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात उतरलेल्या गुजरातच्या तस्कराकडून ८ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांज्याचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. या गांजाची बाजारातील किंमत लाखो रूपयांच्या घरात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. नरेशकुमार मनोहरभाई पंचोली (३४) असे अटक करण्यात आलेल्या तस्काराचे नाव आहे.
कुणाला संशय येऊ नये यासाठी प्रवाशाचा मुखवटा धारण करून प्रवासी बॅगमधून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या या बदमाशाकडून अशा अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास चक्रांना वेग दिला आहे. अटक करण्यात आलेला हा बदमाश गुजरात राज्यातील रहिवासी आहे. गुजरातहून अंमली पदार्थांचा साठा चोरी-छुपे आणून महाराष्ट्रात, विशेषतः कल्याण-डोंबिवलीत वितरीत करत असावा, असा पोलिसांना दाट संशय आहे.
कल्याण जंक्शन हे मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या दिशेने येणारे प्रवासी याच कल्याण जंक्शनवर उतरून इतरत्र निघून जातात. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण हे महत्वाचे जंक्शन मानले जाते. स्थानकातील फलाट क्रमांक सातवरून लांब पल्ल्याच्या मेल व एक्स्प्रेस सुटतात. या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून देशाच्या विविध भागातून प्रवासी येत असतात. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट पाच ते सातवर सुरक्षा बलाचे जवान सतत तैनात असतात. सोमवारी (दि.26) रोजी दुपारच्या सुमारास लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाचे जवान नेहमीप्रमाणे कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सातवर तैनात होते.
या फलाटावर एक इसम प्रवासी म्हणून घुटमळत असल्याचे आढळून आले. हा प्रवासी फलाटावर येणाऱ्या कोणत्याही मेल एक्स्प्रेसमध्ये चढत नव्हता. त्यामुळे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना त्याचा संशय आला. त्याच्याजवळ मोठी बॅग होती. संशयास्पदरित्या घुटमळणाऱ्या इसमाच्या हालचालींवर पाळत ठेवली. पोलिसांनी त्याला चाहोबाजूंनी घेरले. चौकशी केली असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिकच वाढला.
पोलिसांनी प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर हा इसम गांगरला. नरेशकुमार पंचोली असे स्वतःचे नाव सांगणाऱ्या या इसमाने गुजरात राज्यातील रहिवासी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी नरेशकुमार पंचोली याला ताब्यात घेऊन रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात नेले. कसून चौकशी केली असता त्याच्याकडील बॅगेत ८ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. हा इसम अंमली पदार्थांची तस्करी करणारा असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्याच्या विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
लोहमार्गचे पोलिस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त अरूण पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे, पोलिस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण, उपनिरीक्षक प्रमोद जगताप यांच्यासह रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक गौरीशंंकर एडले, सहाय्यक उपनिरीक्षक विजय पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.