ठाणे : उत्तर प्रदेश येथील प्रयागराज जिल्ह्यातील मेजा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेले व सात वर्षांपासून फरार असलेल्या दोघा आरोपींना ठाण्यातून ठाणे खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.16) बेड्या ठोकल्या.
मोनू उर्फ विभास उर्फ प्रशांत कपिल शुक्ला (30) आणि रजत उर्फ प्रभात कपिल शुक्ला (26) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अटकेतील आरोपी दोघे भाऊ असून त्यांनी 2017 साली उत्तर प्रदेशातील मेजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शंकर शुक्ला या व्यक्तीचा खून केला होता. तेव्हापासून हे दोघेही आरोपी फरार होते.
उत्तर प्रदेश प्रयागराज जिल्ह्यातील मेजा पोलीस ठाण्यात दाखल एका खुनाच्या गुन्ह्यातील दोघे फरार आरोपी ठाण्यातील वसंत विहार परिसरात लपून असल्याची माहिती उत्तर प्रदेश एसटीएफ पथकास मिळाली होती. यूपी पोलिसांनी ही माहिती ठाणे पोलिसांना देऊन सदर आरोपींच्या अटकेसाठी मदत मागितली होती. त्यानुसार आरोपींच्या अटकेची कारवाई ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपवली होती. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या आरोपींची माहिती व फोन नंबरवरून खंडणी
विरोधी पथकाने तपास सुरू केला असता दोघे आरोपी ठाण्यातील मुल्ला बाग परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलीस पथकाने आरोपींची परिसरात माहिती मिळवत त्यांना 16 ऑगस्ट रोजी वसंत विहार परिसरातील जुना म्हाडा वसाहत येथून अटक केली. दोघा आरोपींनी 2017 मध्ये मेजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा खून केला असल्याचे चौकशीतून समोर आले असून हे दोघेही आरोपी सात वर्षांपासून फरार होते. अटकेतील दोघा आरोपींना पुढील कारवाईसाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.