ठाणे

Thane crime news | डोंबिवलीत पोलिसांचा थरारक पाठलाग; नायजेरियन ड्रग डीलरसह तिघांना ठोकल्या बेड्या, २.१५ कोटींचे अमली पदार्थ जप्त!

अटक करण्यात आलेल्या या तस्कारांनी अंमली पदार्थांचा इतका मोठा साठा कुठून आणला ? तेकोणाला विक्री करणार होते ? याचा तपास पोलिस करत आहेत

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : देशाचे भवितव्य मानल्या जाणाऱ्या युवा पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विडाच उचलला आहे. पोलिसांच्या खास पथकाने डोंबिवलीपासून काही किमी अंतरावर असलेल्या उंबर्ली गावाजवळ केलेल्या लक्षवेधी कारवाईत नायजेरियन डिलरसह तिघांना अटक केली आहे. या त्रिकुटाकडून पोलिसांनी आतापर्यंत २ कोटी १५ लाख ८० हजार रूपये किंमतीचे मेफोड्रोन (एमडी) आणि कोकेन जप्त केले आहे.

 नायजेरीयन नागरीक (नाव गोपनीय आहे), अविनाश व्यंकटेश सदरला (३४, रा. पनवेलकर आयकॉन, फुले नगर, अंबरनाथ-पश्चिम) आणि गजेंद्रन् संजीव नायडू (३४, रा. दोस्ती कॉलनी, चिंचपाडा, नवरे पार्क, अंबरनाथ-पश्चिम) अशी अटक करण्यात आलेल्या अंमली पदार्थ तस्करांची नावे असून या तिघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अधिक चौकशीसाठी १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ ३ हद्दीतील ८ पोलिस ठाण्यांच्या परिसरात अंमली पदार्थाच्या तस्करी, वितरण आणि विक्री करणाऱ्यांच्या हालचालींवर सूक्ष्म नजर ठेवण्याच्या सूचना पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी खास पथक स्थापन केले आहे. 

अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकातील सपोनि अनिल गायकवाड, ग्रेड पोलिस निरीक्षक जितेंद्र ठोके, सदाशिव देवरे, राहूल शिंदे, अमित शिंदे, खुशाल नेरकर आणि अनिल खरसाण असे सात जण मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे, डिलर, तसेच पोलिस रेकॉर्डवरील हवे असलेले आणि फरार बदमाशांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालत होते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गस्ती दरम्यान या पथकाला डोंबिवलीपासून काही किमी अंतरावर असलेल्या उंबर्ली गावाजवळ सार्वजनिक रस्त्याच्या कडेला तिघेजण संशयास्पदरित्या घुटमळताना आढळून आले. त्यापैकी एकाच्या पाठीवर काळ्या रंगाची सॅग होती. हा नागरिक परदेशी असल्याचे लक्षात येताच त्याच्याकडील सॅगमध्ये अंमली पदार्थांचा मोठा साठा असावा, असा संशय बळावला. शिवाय त्याच्या ताब्यात असलेल्या स्कूटरच्या मागच्या आणि पुढच्या नंबरप्लेट देखील वाकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या तिन्ही बदमाश्यांकडे काहीतरी मोठे घबाड असावे, अशी खात्री पटल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या त्रिकूटावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र या तिघांनी पोलिसांना चकवा देऊन पळ काढला. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता थारारक पाठलाग करून या तिन्ही बदमाश्यांची फर्लांगभर अंतरावर जागीच गठडी वळली.

स्कूटरसह अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २ कोटी ८० हजार रूपये किंमतीचा १ किलो ४ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन अर्थात एमडी, १५ लाख रूपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे कोकेन आढळून आले. या त्रिकूटाकडून अंमली पदार्थ साठ्यासह एम एच ४३ /बी क्यू/९५४५ क्रमांकाची स्कूटर, ५०० रूपयांच्या ४३ भारतीय चलनी नोटा आणि सॅग असा २ कोटी १६ लाख ६२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पथकातील पोशि अमित शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम ८ (क), २२ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात समक्ष हजर करण्यात आले असता त्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अटक करण्यात आलेल्या या तस्कारांनी अंमली पदार्थांचा इतका मोठा साठा कुठून आणला ? ते हा साठा कुणाला विक्री करणार होते ? याचा चौकस तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

वर्षभरात १४६ बदमाशांचे मोडले पेकाट

परिमंडळ ३ हद्दीत १ जानेवारीपासून ३१ डिसेंबरपर्यंत अंमली पदार्थांची खरेदी/विक्री करणाऱ्या २ बदमाशांविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतून १०१ गुन्हे दाखल करून १४६ बदमाशांचे पेकाट मोडून काढण्यात आले आहे. २४४.८१८ किलो ग्रॅम वजनाचा गांजा, ४ किलो १४७ ग्रॅम ०४ मिली ग्रॅम वजनाची एमडी पावडर, १११ ग्रॅम वजनाचा चरस, Nitrazepam Tablets IP 10 mg, NINDIA-10 स या प्रतिबंधित १८०० टॅब्लेट्स आणि कोडीनयुक्त बॉटल असा एकूण ६ कोटी ३६ लाख १४ हजार १५० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही सारी किमया जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साधली आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागातून अंमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांच्या खास पथकाचे शिक्षक, प्राध्यापक आणि पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT