crime news file photo
ठाणे

Thane Crime News | लोखंडी हातोडा डोक्यात मारून कामगाराची हत्या

पुढारी वृत्तसेवा

अंबरनाथ : एका रिडेव्हलपमेन्ट इमारत तोडण्याच्या साईटवर काम करणार्‍या तीन कामगारांपैकी, दोघांमध्ये पैश्याच्या वादातून भांडण झाल्याने सलीम शेख याने अब्दुल रेहमान या दुसर्‍या कामगाराच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून त्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मोहम्मद तौरत अली या तिसर्‍या कामगाराने पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी सलीम शेख (49) या आरोपीस अटक केली आहे. हे कामगार पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत. हे तिघेही इमारत साईट शेजारी एका दुकानांमध्ये सोबत राहत होते.

मयत अब्दुल रेहमान हा अंबरनाथ पुर्व भागातील एका रिडेव्हलपमेन्ट इमारत तोडण्याच्या साईटवर काम करत होता. त्याने आपल्या सोबतीला सलीम शेख आणि मोहम्मद तौमर अली या दोघांना पश्चिम बंगाल येथील कामासाठी आणले होते. या इमारत साईटवर त्यांना 900 रुपये दिवसाला मिळत होते. मात्र त्यातील प्रत्येकी केवळ 700 रुपये अब्दुल रेहमान दोघांना द्यायचा. यावरून सलीम शेख आणि अब्दुल रेहमान यांच्यात वाद होत होता. दरम्यान सलीम शेख याचा मुलगा आजारी असल्याने त्याने अब्दुल रेहमान यांच्याकडे पंधरा दिवसाच्या कामाचे पैसे मागितले. त्यावरून त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. याच रागातून सलीम शेख याने अब्दुल रेहमान याच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारला व त्याला गंभीर दुखापत केली. या सगळ्या प्रकारात मोहम्मद तौमर अली या तिसर्‍या कामगाराने दोघांचे भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. जखमी अब्दुल रेहमान यास उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी अब्दुल रेहमान यास मृत घोषित केले. या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी सलीम शेख यास अटक केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT