ठाणे

राजकीय नेत्याच्या घरीच हाथ की सफाई

दिनेश चोरगे

अंबरनाथ; पुढारी वृत्तसेवा :  भेट घेण्यासाठी आलेल्या एका महिलेनं आपल्या आई आणि भावाच्या मदतीनं अंबरनाथमधील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या घरातच हातसफाई करून रोख रक्कम आणि सोन्याच्या पाच अंगठ्या घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून रोख रक्कम आणि काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अंबरनाथमधील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या घरी जाऊन हातसफाई करणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख रकमेसह १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथमधील एका राजकीय व्यक्तीच्या पत्नीला भेटण्याच्या बहाण्याने राजकीय पक्षात कार्यरत असलेली एक महिला कार्यकर्ती आपल्या आई आणि भावासोबत आली होती. यावेळी राजकीय व्यक्तीच्या पत्नीला बोलण्यात गुंतवून आरोपींनी बेडरुमध्ये ठेवलेल्या बॅगेतून २५ हजार ५०० रुपये आणि टेबलावर ठेवलेल्या सोन्याच्या ५ अंगठ्या घेऊन पोबारा केला. घरातल्या व्यक्तिंना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून सलमान शाह याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याच्या ३ अंगठ्या हस्तगत केल्यात. उर्वरित २ अंगठ्या सोनाराला विकल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT