ठाणे

ठाण्यात फोफावतेय सेक्स रॅकेटचे जाळे

दिनेश चोरगे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ब्युटी सलून अथवा मसाज पार्लर मध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने परप्रांतीय मुलींना ठाण्यात आणून त्यांना देहव्यापार करण्यास भाग पडणाऱ्या भामट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर त्यांच्या जाळ्यात अडकणाऱ्या मुलींची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. ठाणे मानवीय तस्करी विरोधी पथकाने व ठाणे पोलिसांनी गेल्या पाच वर्षात अनैतिक व्यवसायाच्या जाळ्यात अडकलेल्या तीनशेहून अधिक मुलींची सुटका केली आहे. तर गेल्या चार महिन्यातच १६ दलालांना अटक करण्यात येऊन त्यांच्या ताब्यातून ३४ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. त्यात ३ अल्पवयीन मुलींचा देखील समावेश आहे.

ठाण्यात हायफ्रॉफाईल सेक्स रॅकेटचे जाळे दिवसेंदिवस फोफावत असल्याचे पोलिसांच्या कारवाईनंतर स्पष्ट होत आहे. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने नुकतेच टीव्ही सिरीयल व मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या तीन तरुणींची सुटका केली. तर या तरुणींना गलिच्छ व्यवसायात ओढणाऱ्या एका महिला दलालास अटक केली. विशेष म्हणजे ही दलाल महिला देखील मॉडेलिंग व अभिनय क्षेत्रात काम करते. मॉडेलिंग क्षेत्रात येणाऱ्या तरुणींच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा उचलून ही महिला तरुणींना शरीरविक्रयच्या व्यवसायात ओढत होती असे पोलीस तपासातून समोर आले आहे. तिघा पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी राबोडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अटकेतली आरोपी महिला काही ग्राहकांशी फोनवरून संपर्क साधत त्यांना हाय फ्रॉफाईल मुली शरीरसंबंधासाठी पुरवत असे. सुटका करण्यात आलेल्या मॉडेल तरुणींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, सांस्कृतिक शहरात सेक्स रॅकेट वाढत असल्याचे आढळून येत आहे. पोलीस कारवाईच्या आकडेवारीनुसार २०२२ साली पोलिसांनी ६७ मुलींची शरीरविक्रयच्या व्यवसायातून सुटका केली. तर ४२ दलालांना अटक केली. गेल्या चार महिन्यात पोलिसांनी १६ दलालांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ३४ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. त्यात ३ अल्पवयीन मुलींचा देखील समावेश आहे.

अशा अनैतिक व्यवसायाला चाप बसावा आणि मोठ्या प्रमाणात होणारी मानवी तस्करी थांबावी म्हणून ठाणे पोलिसांनी २०१० साली मानवीय तस्करी विरोधी पथकाची स्थापना केली होती. या गलिच्छ व्यवसायात अडकलेल्या ५०० हुन अधिक पीडित महिलांची सुटका पथकाने व ठाणे पोलिसांनी आता पर्यंत केली आहे. त्यात बांगलादेशी महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. या गलिच्छ व्यवसायात अडकलेल्या बहुतांश महिलांची हीच शोकांतिका असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात.

स्पाच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय

आधुनिक शहरात मानवी रुपाला उजाळा देणाऱ्या स्पा, ब्युटी सलून, मसाज पार्लर यांची संख्या देखील झपाट्याने वाढतेय. मात्र या सुंदरता मिळवून देणाऱ्या व्यवसायाला आता काहीसा डाग लागू पाहत असून मसाज पार्लर, स्पा, ब्युटी सलून यांच्या चार भिंतीआड चालणारा • अनैतिक व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत चाललाय. ठाण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवण्यात येत असल्याचे अनेक प्रकार ठाणे पोलिसांनी आता पर्यंत उघड केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT