ठाणे : मलंगगडच्या फ्युनिक्युलर आपल्या परिचयाच्या नागरिकांना न प्रवास दिल्याने प्रकल्प अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. शनिवारी (दि.15) रोजी सायंकाळी झालेल्या या मारहाणीचा सीसीटीव्ही समोर आला आहे. तीन दिवस उलटले तरी मारहाण करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही.
विशेष म्हणजे या तरुणाला पोलीस यंत्रणा अभय देत असल्याने त्याने सोमवारी (दि.17) रोजी पुन्हा फ्युनिक्युलर कार्यालयात प्रवेश केल्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे. अन्य प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवणारे पोलीस का ? गुन्हा दाखल करत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कल्याण जवळील श्री मलंगगडच्या फ्युनिक्युलरचे काम अंतिम टप्प्यात आहे. यात्रा असल्याने या फ्युनिक्युयलर मधून काही नागरिकांनी चाचणी सुरु असल्याच्या दरम्यान आपल्या जबाबदारीवर प्रवास केला होता. आपल्या परिचयाचे नागरिक आले असल्याने त्यांना मलंगगडावर सोडण्याची मागणी प्रतीक पाटील याने केली होती. परंतु फ्युनिक्युलरचे मेंटेनन्सचे काम सुरु असल्याने ती बंद ठेवण्यात आली असल्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर सत्यभ्राता दास यांनी सांगितले. काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या परिचयाच्या नागरिकांना गडावर सोडून देण्यात येईल असं सांगितलं होत. मात्र या प्रकारचा प्रतीक पाटील याला राग आला आणि त्याने सत्य भ्राता दास यांना मारहाण केली तुला बघून घेतो अशी धमकी दिली. त्यानंतर सत्या भ्रता दास व त्यांचे कर्मचारी हे घाबरून हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला आहे. मात्र सदर अर्जाला तीन दिवस उलटले तरी पोलिसांनी मात्र अद्याप त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मलंगगडची फ्युनिक्युलर भक्तांच्या सेवेत रुजू होत आहे. त्यासाठी अपूर्ण काम पूर्ण करायला गती देखील देण्यात आली आहे. मात्र स्थानिक नागरिकांकडून जबरदस्तीने आपल्या परिचयाचे असल्याचे सांगून कर्मचाऱयांना धमकावून मारहाणीचे प्रकार सुरु झाले आहेत. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा कधी गुन्हे दाखल करण्याची तत्परता दाखवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.