वाडा : वाडा तालुक्यात बनावट नोटांची छपाई करणे सुरु असल्याचे समोर आले. तर नेहालपाडा गावात बनावट नोटा छपाईची घटना ताजी असताना वाडा पोलिसांनी शनिवारी (दि.22) रोजी पाली गावात त्रिकुटाला बेड्या ठोकल्या आहेत.
100 व 500 च्या तब्बल 14 लाखांच्या नोटा या घटनेत जप्त केल्या असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. पाली गावाच्या हद्दीत भारतीय चलनातील खर्या व नकली नोटा एकत्रीत करून त्या चलनात आणण्यासाठी काहीजण एकत्र येणार अशी खात्रीशीर माहीती शनिवारी वाडा पोलिसांना मिळाली होती. पोलीसांनी वेषांतर करून पालीनाका येथे पाळत ठेवून काही संशयास्पद व्यक्तींना दुपारच्या सुमारास झडप घालून ताब्यात घेतले. विकास ऊ र्फ विकी प्रकाश पवार, (32) इम्तीयाज बशीर शेख (56) व वसीम अन्वर सय्यद, (36 ), या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
भारतीय बच्चो का बैंक अशा लिहीलेल्या 100 व 500 च्या भारतीय चलनातील नोटांप्रमाणेच दिसणार्या जवळपास 14 लाख रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या. ताब्यात घेतलेल्या तिघांची विचारपूस केली असता सदरच्या नोटा या आदलाबदल करण्यासाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शाना- खाली वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी ही कामगिरी चोख बजावली. तसेच सागर मालकर, मयुरेश अंबाजी, मयूर शेवाळे, पोलीस हवालदार गुरुनाथ गोतारणे, विजय मढवी सहभागी झाले होते.