भिवंडी : ऑनलाईन पैसे कमावण्याच्या लालसेने शिक्षित नागरिकांसह महिला, डॉक्टर व इंजिनियर नागरिकांची ऑनलाइन पैसे कमवण्याच्या नावाने फसवणूक झाल्याच्या घटना भिवंडीत वाढल्या आहेत.मागील वर्षभरात भिवंडीत सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ऑनलाइन चोरट्यांनी लाखोंचा गंडा घातला आहे.याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यां मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून काम करणार्या शहाबाज आलम सनाउल्ला अन्सारी (45) रा.सलामतपुरा यांनी क्रेडिट कार्डने ऑनलाइन पेमेंट करताना पेमेंट न झाल्याने मोबाईलवर आलेली लिंक ओपन करून त्यात जन्मतारीख टाकताच क्रेडिट कार्ड मधून 1 लाख 715 रुपये अज्ञात इसमाने ऑनलाइन चोरल्याची घटना 26 ऑक्टोबर 2022 रोजी घडली होती. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी अज्ञात चोरट्या विरोधात तब्बल एका वर्षा नंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तर फेब्रुवारी 2024 मध्ये ऑनलाइन पैसे कमवून देण्याच्या बहाण्याने सीमा निलेश धुळे वय 29 वर्ष या महिलेची 9 लाख रुपयांची फसवणूक केली असून याप्रकरणी महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तर याच कालावधीत स्नेहल ज्ञानेश्वर माने हा व्यवसायाने डॉक्टर असलेले युवक लोढा अप्पर ठाणे मानकोली याठिकाणी राहत असून त्यांच्या एच डी. एफ. सी. बँक खात्यातून कोणीतरी अज्ञात इसमाने ऑनलाईन 6 लाख 12 हजार 618 रुपये संमतीशिवाय परस्पर फसवणूक करून स्वतःच्या एच.डी. एफ.सी. बँक खात्यात वळवून घेतले.या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर गुन्हे शाखेत ऑनलाईन तक्रार नोंदवली होती .त्यानंतर पोलिसांनी नारपोली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा अज्ञाता विरोधात दाखल केला आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये ऑनलाइन ट्रेडिंग शेअर मार्केट गुंतवणूकीत पैसे गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने शहरातील गैबी नगर परिसरात जुबेर तजम्मुल अंसारी हे व्यवसायाने ऑटोमशिन इंजिनियर राहत असून त्यांना वेगवेगळ्या 11 मोबाईल क्रमांकाने संपर्क साधत आपपसात संगणमत करून त्यांना फसव्या खोट्या अँपची लिंक पाठवुन त्याद्वारे विश्वास संपादन करून शेअर विकत घेण्याच्या बहाण्याने निरनिराळ्या बँक खात्यांवर 69 लाख 98 हजार 375 रुपये एवढी ऑनलाइन फसवणूक केली असून याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात 11 मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधणार्यां अज्ञातां विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अशाच प्रकारे एका प्रकरणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास सुरुवातीला चांगले उत्पन्न मिळवून देऊन त्यानंतर अधिक परताव्याचे अमिष दाखवत महिलेची 14 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार जुलै 2024 मध्ये घडली आहे.शाळा कॉलेजमध्ये सायबर गुन्हेगारी विषयी जनजागृती केली जात असून यापुढे नागरिकांमध्ये सायबर गुन्हेगारी संदर्भात जनजागृती करण्यात येणार असून, पैशाच्या अमिषाला बळी न पडता कोणतीही ओटीपी अथवा लिंक शेअर करू नये अथवा कोणत्याही मोहाला बळी पडू नये अशी प्रतिक्रिया भिवंडी पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांनी दिली आहे.