ठाणे : एकाला दुचाकी खरेदीसाठी तर दुसऱ्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे हवे असल्याने दोन विद्यार्थ्यांनी कट रचून, गळ्यातील सोन्याची साखळी मिळवण्यासाठी आपल्याच वर्गमित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून सुरुवातीला बेपत्ता (मिसिंग) म्हणून नोंद असलेल्या या गुन्ह्याचा कसून तपास करत पोलिसांनी अखेर १३ दिवसांनंतर छडा लावला. याप्रकरणी १७ वर्षीय दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
२५ सप्टेंबर रोजी आझादनगर येथे राहणाऱ्या चंद्रकांत कांबळे यांनी त्यांचा दहावीत शिकणारा १७ वर्षीय मुलगा घरी परतला नसल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता, बेपत्ता मुलाच्या एका वर्गमित्राने खोटी माहिती दिली. २४ सप्टेंबर रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास तो ब्रह्मांड सर्कल येथून एका अनोळखी मुलासोबत पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हावरून घोडबंदर रोडच्या दिशेने गेल्याचे त्याने सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरातील सुमारे ८० ते ९० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले; मात्र त्यात तो मुलगा कुठेही दिसून आला नाही.
माहिती देणाऱ्या विद्यार्थ्याच्या हालचालींवर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची पुन्हा चौकशी केली. मात्र, त्याने भावनिक नाटक करत, मित्र बेपत्ता झाल्याचे अतोनात दुःख झाल्याचे भासवून आपलीच माहिती खरी असल्याचे ठासून सांगितले. एकीकडे बेपत्ता मुलाचा शोध लागत नव्हता, तर दुसरीकडे सीसीटीव्हीमध्येही काही निष्पन्न होत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी संशयित विद्यार्थी आणि बेपत्ता मुलगा या दोघांच्याही मोबाइल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण (CDR) केले.
यातून काही संशयास्पद बाबी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी १५ ऑक्टोबर रोजी त्या विद्यार्थ्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने अन्य एका मित्राच्या मदतीने वर्गमित्राची हत्या केल्याची कबुली दिली. संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ब्रह्मांड फेज-२ मधील निर्जन झाडाझुडपांतून बेपत्ता विद्यार्थ्याचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला.
ताब्यात घेतलेल्या दोघांनाही पैशांची तीव्र गरज होती. एकाला स्वतःचा वाढदिवस साजरा करायचा होता, तर दुसऱ्याला नवी दुचाकी घ्यायची होती. दरम्यान, आपल्या वर्गमित्राच्या गळ्यात सोन्याची जाड साखळी असल्याचे त्यांना माहीत होते. ती मिळवण्यासाठी दोघांनी त्याच्या हत्येचा कट रचला. २४ सप्टेंबरच्या रात्री सिगारेट ओढण्याच्या बहाण्याने त्यांनी मित्राला ब्रह्मांड फेज-२ येथील निर्जनस्थळी नेले. तेथे दोघांनी चाकूने भोसकून व डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन त्यांनी मृतदेहावर पेट्रोल ओतून तो जाळण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी व मोबाइलचे लोकेशन सतत बदलत राहावे म्हणून त्यांनी मयत मुलाचा मोबाइल फोडून एका धावत्या बसच्या छतावर फेकून दिला होता. मात्र, तांत्रिक तपास आणि पोलिसी खाक्यापुढे अल्पवयीन आरोपींचे पितळ उघडे पडले आणि १३ दिवसांनंतर या गुन्ह्याचा छडा लागला.