गणेशोत्सव file photo
ठाणे

ठाणे : ‘विसर्जन आपल्या दारी’ संकल्पनेसाठी सहकार्य हवे

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील सर्व प्रभागांत विसर्जन आपल्या दारी ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याने गणेशभक्तांचे सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी जय्यत तयारी केली आहे. महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत गणेशोत्सव काळात गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून एकूण 2 हजार 735 हॅलोजन बसविण्यात आले आहेत. 70 जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. 103 ठिकाणी टॉवर लाईटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय 180 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या नियंत्रणाखाली देखरेख केली जाणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये यंदाच्या गणेशोत्सवासाठी विविध परवानग्या देण्याकरिता महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये 23 ऑगस्टपासून आतापर्यंत एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 224 मंडप/स्टेजना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये 13 मंडपांना 5 वर्षांसाठी परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व प्रभागातंर्गत 56 कमानींना परवानग्या देण्यात आल्या आहेत.

गणेशमूर्तींच्या विर्सजनासाठी कल्याणात 22 नैसर्गिक, तर 36 कृत्रिम तलाव उपलब्ध आहेत. डोंबिवली विभागात 30 नैसर्गिक, तर 27 कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी विसर्जन आपल्या दारी ही संकल्पना देखील प्रत्येक प्रशासकीय प्रभागांत राबविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कल्याणमधील दुर्गाडी गणेश घाटासह पश्चिम डोंबिवलीकडील रेतीबंदर (मोठागाव) विसर्जन घाटावर मोठ्या उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महानगरपालिकेने चोख व्यवस्था केली आहे. कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाट आणि डोंबिवलीच्या रेतीबंदर (मोठागाव) विसर्जन घाट अशा दोन्ही ठिकाणी मंडप व्यवस्था, बॅरीकेट्स, ध्वनीक्षेपण, हायड्रा व फोरक्लिप, आदी साधनसामुग्री तैनात करण्यात आली आहे. शिवाय या दोन्ही ठिकाणी ठेकेदाराचा समन्वयक पूर्णवेळ उपलब्ध राहणार आहे. विसर्जनस्थळी संकलीत होणारे निर्माल्य आणि ओला कचरा प्लॅन्टमध्ये पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जाणार आहे.

विविध एनजीओंचे सहकार्य

डोंबिवलीतील निर्माल्य श्री गणेश मंदिर संस्थानाच्या एमआयडीसीतील प्रकल्पाकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठविले जाणार आहे. यासाठी महापालिकेस शाळांचे तसेच एनएनएसचे विद्यार्थी व विविध एनजीओंचे देखील सहकार्य लाभणार आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी स्वत: कल्याण आणि डोंबिवलीतील मूर्तीकार, गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी आणि विविध प्राधिकरणांच्या अधिकार्‍यांसमवेत बैठका घेऊन गणेशोत्सव कालावधीत येणार्‍या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीला उपस्थित अधिकार्‍यांना समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT