डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील काँक्रीटच्या रस्त्यांना खोदकामाचे ग्रहण लागले आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नव्याने तयार करण्यात आलेले काँक्रीट रस्ते वारंवार फोडण्यात येत आहेत.
वारंवार रस्ते फोडण्यात येत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पद्मश्री नानासाहेब धर्माधिकारी रोडला असलेल्या सोनाक्षी सोसायटीसमोर महावितरणची भूमिगत वीज वाहिनी निकामी झाली. हीच संधी साधून रात्रीच्या सुमारास नव्याने बांधलेला रस्ता फोडण्याची वेळ आली.
बुधवारी (दि.11) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अचानक जेसीबीसह आठ-दहा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि रस्ता फोडण्यास सुरूवात केली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ नवीन केबल टाकून वीजपुरवठा सुरळीत केला. ग्राहकांच्या वीज सेवेत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हे काम रात्री करण्यात आल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. या प्रकारावरून रहिवाशांनी समाजमाध्यमांद्वारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी प्रशासनाच्या नियोजनशून्यतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. महावितरणची जबाबदारी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची असल्याने त्यांच्यावर थेट दोष देणे योग्य ठरणार नाही. मात्र, एमएमआरडीएने नवीन काँक्रीट रस्ते तयार करताना महावितरणसारख्या सेवा यंत्रणांना आवश्यक ती पूर्वसूचना व वेळ दिला नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
गेल्या वर्षभरात एमआयडीसी परिसरात जवळपास ३० वेळा नवीन बनवलेल्या काँक्रीट रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. विविध सेवा वाहिन्यांच्या देखभाल-दुरूस्तीच्या कारणास्तव हे रस्ते तोडले जात असून त्यांचे पुनर्बांधकाम पूर्णपणे समाधानकारक न झाल्याची तक्रार स्थानिक रहिवासी वारंवार करत आहेत. तथापी शासन-प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने जनतेच्या पैशांचा अपव्यय करणाऱ्या यंत्रणांच्या बेपर्वा कारभारावर परिसरातील रहिवाशांनी समाजमाध्यमांवर ताशेरे ओढले आहेत.
जनतेच्या पैशांचा असा अपव्यय करणाऱ्या यंत्रणांना, तसेच मिठाची गुळणी धरलेल्या नेते, लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांना येत्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जागरूक मतदार नक्कीच जाब विचारेल. या प्रकारांमुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी विविध विभागांमध्ये योग्य समन्वय राखणे आणि एकत्रित नियोजन करणे काळाची गरज बनली असल्याचे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले.