डोंबिवलीकर मृत पर्यटकांजवळील किंमती सामान पहलगाम पोलिसांकडून ताब्यात घेऊन हे सामान कुटुंबियांच्या सुपूर्द करण्यात आले. Pudhari News Network
ठाणे

ठाणे : दहशतवादी हल्ल्यातील डोंबिवलीकर मृतांचा किंमती ऐवज कुटुंबीयांच्या स्वाधीन

ऐवजात बॅगा, मोबाईल, सोन्याच्या चेनी, अंगठ्या, घड्याळांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : जम्मू-काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बेसरन पठरावर मंगळवारी २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. या तिन्ही मृत पर्यटकांजवळील बॅगा आणि इतर किंमती ऐवज घटनास्थळीच पडून होता.

पहलगाम पोलिस आणि लष्कराने हे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याजवळ पडलेला किमती ऐवज पहलगाम पोलिसांनी ताब्यात घेतला होता. बॅगा, मोबाईल, सोन्याच्या चेनी, अंगठ्या, घड्याळे असा सर्व किंमती ऐवज पहलगाम पोलिसांनी श्रीनगर विमानतळावर डोंबिवलीतील शिवसेना कार्यकर्त्यांच्या स्वाधीन केला. डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक संतोष चव्हाण, विवेक खामकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि स्वीय साहाय्यक अभिजीत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांची एक तुकडी मृत पर्यटक संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी श्रीनगरला रवाना झाली होती. दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना सहाय्य करण्यासह त्यांना सुरक्षितपणे डोंबिवलीत आणणे, तिन्ही मृतदेह पहलगाम येथील पोलिसांकडून ताब्यात घेऊन ते डोंबिवलीत आणणे, मृतांजवळील किंमती ऐवज, त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र पहलगाम येथील सिव्हील रुग्णालयातून घेणे या कामासाठी ही तुकडी गेली होती. अनपेक्षितपणे हल्ला होण्यापूर्वी हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले यांच्याकडे पर्यटनासाठी लागणाऱ्या बॅगा, त्यांची मनगटी घड्याळे, मोबाईल, गळ्यात सोन्याच्या चेनी, बोटांतल्या अंगठ्या, असा किंमती ऐवज होता. या तिघांना दहशतवाद्यांनी मारल्यानंतर त्यांच्या जवळील किंमती ऐवज घटनास्थळीच पडून होता. त्यांचे नातेवाईक स्थानिकांनी केलेल्या सूचनेप्रमाणे दहशतवाद्यांपासून बचावासाठी घटनास्थळावरून पहलगामला परतले होते. घडलेल्या घटनांमुळे तिन्ही मृतांचे कुटुंबीय भेदरले होते. घरातील सदस्याला आपल्या समोरच मारल्याने तिन्ही कुटुंबे सुन्न झाली होती.

हल्ल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या लष्कर आणि विशेष पोलिस दलाच्या जवानांनी मृतदेहांजवळ पडलेले सर्व किंमती साहित्य जमा केले. मृतदेहांचा ताबा देताना, त्याप्रमाणे ते मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या डोंबिवलीतील शिवसैनिकांच्या स्वाधीन केले. किंमती ऐवजाचा ताबा घेत असताना काही क्षण मन हेलावून गेले, असे संजय निकते यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत ज्येष्ठ शिवसैनिक संतोष चव्हाण, विवेक खामकर होते. त्या क्षणी आम्ही सर्वजण सुन्न झालो होतो, असे संतोष चव्हाण यांनी सांगितले.

पहलगाम येथील सिव्हील रूग्णालयाकडून मृतांचे मृत्यू प्रमाणपत्र संजय निकते यांनी स्वीकारले. श्रीनगर विमानतळावर अतिशय संयमितपणे या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या. इंडिगो एअरलाईन्सचा कर्मचारी वर्ग या सगळ्या आव्हानात्मक प्रक्रिया पाहत होता. या सगळ्या कामाची दखल घेऊन इंडिगो एअरलाईन्सच्या हवाई सुंदरीने संजय निकते यांना नेटकेपणाने केलेल्या कामाच्या कौतुकाचे पत्र दिले.

डोंबिवलीत परतल्यावर संजय निकते, संतोष चव्हाण, विवेक खामकर यांनी अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांच्या जवळ असलेला, पण घटनास्थळी पडलेला पहलगाम पोलिसांनी ताब्यात घेतलेला किंमती ऐवज लेले, मोने आणि जोशी कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. हा ऐवज स्वीकारताना कुटुंबीय शोकाकुल झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT