एसटी महामंडळ pudhari file photo
ठाणे

ठाणे : दिलासादायक! उत्पन्नवाढीसाठी एसटी चालक-वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : प्रवासी वाहतूक करताना एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पन्न आणणार्‍या चालक व वाहकांना प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

एसटीच्या प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणार्‍या चालक -वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी 20 टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना समप्रमाणात वाटण्यात येणार आहे. ही भत्याची रक्कम चालक - वाहकांना त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे. एसटी महामंडळाने आपले उत्पन्न वाढावे म्हणून विविध उपयोजना व अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत.

एसटीच्या तोट्यातील आगारांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. इंधन बचतीसाठी चालक व यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचे वितरण करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे एसटी महामंडळाने ऑगस्ट 2024 या महिन्यात 16 कोटी 86 लाख, 61 हजार रुपये नफा मिळवला आहे. उत्पन्न वाढीतील सातत्यासाठी चालक-वाहक हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून त्यांची कामगिरी चांगली व्हावी, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी वाढीव उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना महामंडळाने सुरू केली आहे.

प्रोत्साहन भत्ता देऊन सन्मान करणार

प्रवासी तक्रार, प्रवाशांशी केलेले गैरवर्तणूक अथवा उत्पन्न वाढीसाठी अवैध मार्गाचा वापर केल्यास संबंधित चालक-वाहक यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही. असेही, महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे योग्य कामगिरी करणार्‍या चालक-वाहकांना रोख स्वरूपात प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाल्यास सदर योजना पुढे चालू ठेवण्याचा महामंडळाचा मानस आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT