Thane Circular Metro Pudhari
ठाणे

Thane Circular Metro: ठाण्यात वर्तुळाकार मेट्रोविरोधात ५०० हून अधिक नागरिकांचा मूक मोर्चा; वृक्षतोडीला विरोध

नाथ पै मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा विचार करण्याची रहिवाशांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: वर्तुळाकार मेट्रोच्या प्रस्तावित मार्गामुळे वाहतूक, वृक्षतोड आणि परिसरातील हिरवळीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत वसंत विहार, बॅरिस्टर नाथ पै (ग्लॅडिस अल्वारिस) मार्ग परिसरातील पाचशेहून अधिक नागरिकांनी रविवारी मूक मोर्चा काढत आपला विरोध नोंदविला.

खेवरा चौक येथून सुरू झालेल्या या मोर्चात विविध गृहसंकुलांमधील रहिवासी तसेच स्थानिक व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने महामेट्रो आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे.

मात्र, प्रस्तावित मार्गिकेमुळे काही भागातील झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होण्याबरोबरच उपलब्ध हिरवळ, पदपथ आणि स्थानिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाथ पै मार्ग परिसरातील नागरिकांनीही रविवारी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

सकाळी आठ वाजता जी. ए. रोड–बॅ. नाथ पै रोड रहिवासी कृती समितीच्या वतीने हा मूक मोर्चा काढण्यात आला. नाथ पै मार्गावर आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने मेट्रोची प्रस्तावित मार्गिका याच रस्त्यावरून गेल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना रस्ता ओलांडताना होणाऱ्या अडचणींकडेही त्यांनी लक्ष वेधले.

परिसरात असलेली हिरवळ, पदपथ आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेली मोकळी जागा ही या भागाची वैशिष्ट्ये आहेत. मेट्रोच्या कामामुळे या सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली. प्रस्तावित फूटहिल रस्त्याच्या दिशेने मार्गिका वळविणे, मेट्रोचा काही भाग भूमिगत करणे किंवा व्यवहार्य अन्य पर्यायी मार्ग निश्चित करणे, असे पर्याय नागरिकांनी प्रशासनासमोर मांडले आहेत.

स्थानिक व्यापाऱ्यांचाही आंदोलनाला पाठिंबा

मोर्चामध्ये व्हॅली टॉवर, ॲक्मे ओझोन, ईडन वूड्स, हिरानंदानी मेडोज, हरसिद्ध पार्क, निहारिका, लोकपुरम, अशर, अशर एज, वसुंधरा, ग्लेंडेल, लोक उपवन, अशर इन्फिनिटी, हिरानंदानी इस्टेट यांसह नाथ पै मार्ग आणि वसंत विहार परिसरातील विविध गृहसंकुलांतील रहिवासी सहभागी झाले होते.

स्थानिक व्यापाऱ्यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, नागरिकांनी कोणताही अनुचित प्रकार न घडविता शांततेच्या मार्गाने आपला विरोध प्रशासनापर्यंत पोहोचविला. मेट्रो प्रकल्पाला विरोध नसून, परिसराचे नुकसान टाळून आणि नागरिकांच्या हिताचा विचार करून मार्गिका निश्चित करावी, अशी भूमिका रहिवासी कृती समितीने स्पष्ट केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT