डोंबिवली : सध्याच्या जमान्यात कुणाला मदत करणेही जीवावर बेतू शकते याचा प्रत्यय एका तरुणाला आला. अपघातात जखमी झालेल्या दोन मुलांना वाचविले आणि याच प्रकरणात पोलिसांना अपघात करुन पसार झालेल्या वाहन चालकाची नावे सांगितल्याच्या संशयावरून चांगले काम करणार्या या तरुणावर चॉपरने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेच्या वसंत व्हॅली रोडवर घडली आहे. हा चॉपर हातात घेऊन या तरुणाचा पाठलाग करण्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. या हल्ल्यात सत्कार भोईर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवून खडकपाडा पोलिसांनी फरार हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी गांधारी परिसरात एका भरधाव जीपने दोन मुलांना उडविले होते. जीप चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. त्या दोन जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सत्कार भोईर याने पुढाकार घेतला. तसेच या मुलांना कुणी उडविले? याची माहिती सत्कार भोईर याने पोलिसांना दिली होती.
सत्कार भोईर हा शुक्रवारी दुपारी खडकपाडा परिसरात चायनीज खाण्यासाठी आला होता. सत्कर्म करणार्या सत्कारला ओळखल्यानंतर तरुणाने सोबत आणलेल्या चॉपरने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वतःला वाचविण्यासाठी त्याने तेथून पळ काढला. तरीही त्याने पाठलाग करत एका ठिकाणी गाठले आणि त्याच्यावर चॉपरने वार केले. या हल्ल्यात सत्कार जबर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी जखमी सत्कारच्या जबानीवरून गुन्हा नोंदवून आर्यन पाटील आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे. एकीकडे हा सारा प्रकार परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. मात्र दुसरीकडे जखमी झालेल्या सत्कारच्या जीवाला धोका वाढला आहे. पोलिसांनी याची खबरदारी घ्यावी, अशी त्याच्या नातेवाईकांनी मागणी केली आहे.