नेवाळी : डोंबिवलीत फुटपाथवर जुन्या वाहनांची विक्री सुरू झाली आहे. मेट्रो 12 च्या कामासाठी आधीच अरुंद झालेल्या कल्याण शीळ रस्त्यावर जुन्या वाहनांचा सेल सुरू झाल्याने अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र केडीएमसीकडून दुकानदारांना अभय दिला जात असल्याने कोंडीच्या वेळी वाहनचालकांचे हाल सुरू झाले आहेत. एकीकडे कोंडीमुक्त वाहनचालकांचा प्रवास करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु केडीएमसीच्या दुर्लक्षामुळे जुन्या वाहनांचे सेल रस्त्यावर बिनधास्त सुरू झाले आहेत.
कल्याण शीळ रस्त्यावरील गोळवली गावापासून काटई नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. फुटपाथसह दुकानदारांनी रस्त्यावर देखील अतिक्रमण केले आहे. मात्र हे अतिक्रमण केडीएमसीसह वाहतूक पोलिसांच्या देखील निदर्शनास येत नसल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवाचा कालखंड सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा कल्याण शीळ रस्त्यावर लागलेल्या असतात. दररोज सकाळ आणि सायंकाळ निर्माण होणार्या वाहतूक कोंडीतून वाहनचालक मार्ग काढत आहेत. मात्र वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारे अतिक्रमण प्रशासनाच्या निदर्शनास येत नसल्याने नागरिक देखील अधिकार्यांवर संताप व्यक्त करत आहे. काही दिवसांपासून कल्याण शीळ रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेला व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र वाहतूक कोंडी मुक्ततेसाठी कोणत्याही उपायोजना होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे सेल लागलेल्या या बाजाराकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कल्याण-शीळ रस्त्यावर मेट्रो 12 चे काम सुरू आहे. यासाठी दोन लेन ठेकेदाराने गिळंकृत केल्या आहेत. सणासुदीच्या कालखंडात काम बंद ठेवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र कामाला स्थगिती न देता काम सुरू आहे. त्यातच फुटपारसह एका लेनवर अतिक्रमण करून वाहनांचे सेल रस्त्यावर लावणार्यांना प्रशासन अभय देत असल्याने नेटकरी देखील समाचार घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता कोंडी मुक्त रस्ता करण्यासाठी केडीएमसीला कधी मुहूर्त मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.