bribe case one arrested
महावितरणचा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात Pudhari File Photo
ठाणे

Thane Bribe News | लाच स्वीकारताना महावितरणचा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

विक्रमगड : विक्रमगड महावितरण विभागाकडे एका व्यक्तीने नवीन दोन विद्युत मीटर मिळावेत यासाठी अर्ज केला असता अर्जाच्या अंतिम मंजुरीसाठी महावितरण सहाय्यक अभियंत्याने ग्राहकाकडे 8 हजारांची लाच मागितली. ग्राहकाने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सोमवारी (दि.२२) रोजी सायंकाळी या अभियंत्याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. संदिप जवाहर असे या लाचखोर अभियंत्यांचे नाव असून विक्रमगड महावितरण विभागात सहाय्यक अभियंता या पदावर तो विराजमान होता.

पोलीस उप अधिक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहिती नुसार तक्रारदाराने वडिलांच्या नावे नवीन दोन विद्युत मीटर कनेक्शनसाठी महावितरण विभाग विक्रमगड यांच्याकडे अर्ज केले होते. प्रक्रियेनुसार स्थानिक वायरमेन यांनी स्थळपाहणी अहवाल तयार करून संदीप जवाहर याच्याकडे तो सादर केला. अर्जावर पुढील कार्यवाही करण्याकरीता संदीप जवाहर याने तक्रारदाराकडे 8 हजार रुपयांची लाच मागितल्याने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी (दि.२२) रोजी पडताळणी करुन याच दिवशी सायंकाळी या लाचखोर अभियंत्याला लाचेची रक्कम स्विकारताना सापळा रचून पकडण्यात आले. आरोपीला चौकशी व पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले असून संदिप जवाहर या अभियंत्याच्या विरोधात चंद्रपूर जिल्हयात याआधीही लाचखोरीचा गुन्हा दाखल असून तो गुन्हा न्यायप्रविष्ट असताना त्याला पुन्हा अटक झाली आहे. सामान्य जनतेला बेजार करुन सोडलेल्या या अधिकार्‍यावर झालेल्या या कारवाईचे जनतेनेही स्वागत केले आहे.

SCROLL FOR NEXT