डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील मॉडेल स्कूलजवळ असलेल्या श्रीराम आर्केड आणि श्रमविश्राम सोसायटी समोरचा नवा कोरा काँक्रीटीकरण केलेला रस्ता मंगळवारी (दि.5) अचानक ब्रेकर आणून एमआयडीसीकडून तोडण्यास सुरूवात झाली आहे. काही जागरूक नागरिकांनी याची विचारणा केली असता, नवीन ड्रेनेज वाहिन्या टाकायच्या असल्याने रस्ता तोडावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
रस्ता तोडण्याचे काम एमआयडीसीच्या ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. चांगला बांधलेला रस्ता पुन्हा खराब होणार असल्याने या भागातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. रस्ता तोडण्याच्या कामामुळे पाणी आणि वीज वाहिन्यांना देखिल नुकसान पोहोचू शकते. हे काम रस्ता बनवण्याआधी करता आले असते. येथून जवळच मॉडेल स्कूल असून तेथे मतदान केंद्र आहे. मतदान साहित्य आणि मतदारांना येण्या-जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता असताना घाईगडबडीने सदर रस्ता तोडण्याची गरज नव्हती. स्थानिक जागरूक रहिवासी मंदार स्वर्गे आणि सागर पाटील यांनी या संदर्भात एमआयडीसीला जाब विचारला आहे. आता प्रशासन यावर काय कार्यवाही करते, याकडे परिसरातील रहिवाशांच्या नजरा लागल्या आहेत.