Crime News  file photo
ठाणे

ठाणे : धावत्या लोकलमध्ये बलदंड बाऊन्सरचा उन्माद

डोंबिवलीकर प्रवाशांना विनाकारण धमक्या; नोटीसद्वारे लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली ताकीद

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : बजरंग वाळुंज

डोंबिवली ते नाहूर दरम्यान लोकलने प्रवास करत असताना गुरूवारी (दि.5) दुपारच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका बलदंड बाऊन्सरने कोणतेही कारण नसताना दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. लोकलमधील तिघा प्रवाशांना दमदाटी करून त्यांना मारण्याची धमकी दिली. तसेच एका भिक्षूकाला जय श्रीराम बोलण्याची सक्ती केली. वेगवेगळ्या कारणांवरून धाक व धमक्या देणाऱ्या बाऊन्सरच्या विरोधात एका जागरूक प्रवाशाने डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून या बाऊन्सरला पुन्हा असे केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीसद्वारे सक्त ताकीद दिली आहे.

यातील वयोवृद्ध तक्रारदार हे डोंंबिवलीकर रहिवासी आहेत. तर या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला बाऊन्सर 28 वयोगटातील असून तो डोंबिवली जवळच्या लोढा हेवन परिसरात राहतो. या संदर्भात लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, गुरूवारी (दि.5) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तक्रारदार गृहस्थ डोंबिवली ते नाहूर लोकलने प्रवास करत होते. इतक्यात त्याच लोकलमध्ये अन्य प्रवाशांसह एक भिक्षूकही प्रवास करत होते. याच लोकलच्या डब्यातून बलदंड शरीरयष्टीचा बाऊन्सर देखिल प्रवास करत होता. तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हा बाऊन्सर दारूच्या नशेत धुंद होता. त्याने तक्रारदारासह अन्य दोघा प्रवाशांशी वाद उकरून काढत लोकलमध्ये आरडाओरडा सुरू केला. इतर प्रवासी त्याला शांत राहण्याचा सल्ला देत होते. तथापी बाऊन्सर काही केल्या ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने तक्रारदारासह अन्य प्रवाशांना काहीही कारण नसताना मारण्याची धमकी दिली. याच लोकलच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या एका भिक्षूकाला त्याने जय श्रीराम बोलण्याची सक्ती केली. लोकल डब्यात गोंधळ घालून मारण्याची धमकी दिल्याने भयभीत झालेल्या प्रवाशाने त्याच दिवशी रात्री बाऊन्सरच्या विरोधात डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून सदर बाऊन्सरला नोटीसद्वारे पुन्हा असे न करण्याची नोटीस बजावली. कायदा, शांतता आणि सुव्यवस्था बिघडविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी बाऊन्सरला बजावले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT