मिरा-भाईंदर पालिका  file photo
ठाणे

ठाणे : पालिका पॅनलच्या 2 स्ट्रक्चरल ऑडिटर्सकडून बोगस अहवाल

पुढारी वृत्तसेवा
भाईंदर : राजू काळे

मिरा-भाईंदर महापालिकेच्या पॅनलवर असलेल्या दोन स्ट्रक्चरल ऑडीटर्सकडून अनुक्रमे मीरारोड येथील बार व हॉटेलचे बांधकाम अस्तित्वात नसतानाही दोन मजल्यांचे बांधकाम दाखवून त्यांच्या दुरुस्तीसाठी परवानगी देण्याची शिफारस प्रभाग अधिकार्‍यांना बोगस स्ट्रक्चरल ऑडिट अहवालाद्वारे केल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

तत्कालीन प्रभाग अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी न करता प्राप्त अहवालावर विश्वास ठेवून त्यांना दुरुस्ती परवानगी दिल्याप्रकरणी त्या प्रभाग अधिकार्‍यांसह दोन्ही स्ट्रक्चरल ऑडिटर्सवर ठोस कारवाई करण्याची मागणी भाजपचे प्रभाग क्रमांक 18 चे अध्यक्ष नितीन नाईक यांनी शहर अभियंता दीपक खांबित यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

बोगस स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल देणार्‍या स्ट्रक्चरल ऑडिटर्सची नावे मोहम्मद शोएब भाटी व मधु एन. मिश्रा अशी आहेत. पालिकेने शहरातील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी 30 हुन अधिक स्ट्रक्चरल ऑडिटर्सची पालिकेच्या पॅनलवर नियुक्ती केली आहे. कोणत्याही बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पालिकेच्या तत्कालीन महासभेत त्या ऑडिटर्सना मोबदला म्हणून शुल्क निश्चितीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. प्रभाग समिती क्रमांक 6 अंतर्गत काशिमीरा येथील स्वागत बार (समुद्रा बार) व हाटकेश सिग्नल येथील शाही हंटिल (एडन बेकरी) यांनी पालिकेकडून स्ट्रक्चर ऑडीट करून घेण्यासाठी प्रभाग समिती 6 मधील तत्कालीन प्रभाग अधिकारी सचिन बच्छाव व योगेश गुणीजन यांच्याकडे अर्ज केला होता. या दोन्ही बांधकामांचे स्ट्रक्चर ऑडीट करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी तत्कालीन प्रभाग अधिकार्‍यांनी स्ट्रक्चरल ऑडिटर मोहम्मद भाटी व मधु मिश्रा यांना सांगितले.

त्यानुसार स्ट्रक्चरल ऑडिटर मिश्रा यांनी स्वागत बारचे पूर्वीचे बांधकाम तळ मजल्याचे असतानाही त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात तळ अधिक 2 मजली बांधकाम असल्याचे नमूद केले. तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर मोहम्मद भाटी यांनी शाही हॉटेलचे पूर्वीचे बांधकाम तळ अधिक 1 मजल्याचे असताना ते तळ अधिक 2 मजली असल्याचे स्ट्रक्चरल अहवालात नमूद केले.

या दोन्ही स्ट्रक्चरल ऑडीटोर्सकडून प्रभाग अधिकर्‍यांना बोगस अहवाल सादर केल्यानंतर प्रभाग अधिकार्‍यांनी त्या ठिकाणची स्थळ पाहणी करणे अपेक्षित होते. मात्र त्याची पाहणी न करताच प्राप्त स्ट्रक्चरल ऑडीटर्सकडून प्राप्त अहवालावर विश्वास ठेवून तत्कालीन प्रभाग अधिकार्‍यांनी स्वागत बार व शाही हॉटेलला दोन मजली बांधकामाची दुरुस्ती परवानगी दिली.

अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन?

पालिका पॅनलवरील दोन्ही स्ट्रक्चरल ऑडिटर्सकडून आपल्या कर्तव्याचा गैरफायदा घेत बोगस ऑडिट अहवाल सादर केला. तर जागेची प्रत्यक्ष पाहणी न करता प्राप्त स्ट्रक्चरल ऑडिट अहवालावरच विश्वास ठेवून तत्कालीन प्रभाग अधिकार्‍यांनी अनधिकृत बांधकामांना प्रोत्सहन देत दुरुस्ती परवानगी दिल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. याप्रकरणी दोन्ही स्ट्रक्चरल ऑडिटर्सची पालिकेच्या पॅनलवरील सेवा खंडीत करून अधिकार्‍यांवर ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नाईक यांनी शहर अभियंता दीपक खांबित यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

दोन हॉटेलचे अनधिकृत वाढीव बांधकाम

बांधकाम अस्तित्वात नसतानाही देण्यात आलेल्या दुरुस्ती परवानगीनंतर स्वागत बार व शाही हॉटेलच्या मालक व चालकांनी अनुक्रमे दोन व एक मजल्याचे अनधिकृत वाढीव बांधकाम केल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. त्यात बोगस स्ट्रक्चरल ऑडिट अहवालासह दुरुस्ती परवानगीची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT