ठाणे : भाजपाने संघटनात्मक बदल करीत शहरातील १८ मंडल अध्यक्षपदी तरुणाईला संधी दिली आहे. ३५ ते ४५ वयोगटातील आक्रमक तरुण कार्यकर्त्यांच्या हाती स्थानिक संघटना सोपविली असून, संघटना बळकट करण्याचे `लक्ष्य' ठेवले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी तरुणांची टीम बांधणी करून ठाण्यात `शत प्रतिशत भाजपा' करण्याचा निर्धार केला आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात आज एकाच वेळी मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यानुसार ठाणे शहर जिल्ह्यात मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली. यापूर्वी भाजपाची ठाणे महापालिका क्षेत्रात १२ मंडले अस्तित्वात होती. त्याची पुनर्रचना करून १८ मंडले तयार करण्यात आली, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली. भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्यात आला. त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन नव्या मंडलाध्यक्षांची निवड करण्यात आली. भाजपाच्या संघटन पर्व अभियानात शहरात नोंदणीलाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व भागात संघटनात्मक जाळे मजबूत करून प्रत्येक बूथवर ५१ टक्के मते मिळविण्याचा निर्धार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली.
भाजपाच्या वडवली मंडल अध्यक्षपदी ज्योती ठाकूर, वसंत विहार-शिवाईनगर अध्यक्षपदी राकेश चौघुले, वर्तकनगर-माजिवडा अध्यक्षपदी वैभव कदम, लोकमान्य नगर अध्यक्षपदी निलेश पाटील, ज्ञानेश्वर नगर-वैतीवाडी अध्यक्षपदी भूषण पाटील, इंदिरा नगर अध्यक्षपदी गुलाब झा, वागळे इस्टेट अध्यक्षपदी निलेश लोहोटे, कोपरी अध्यक्षपदी कृष्णा भुजबळ, ब्रह्रांड-बाळकूम अध्यक्षपदी निलेश पाटील, मानपाडा अध्यक्षपदी जितू मढवी, राबोडी अध्यक्षपदी विनया भोईर, वृंदावन-पाचपाखाडी अध्यक्षपदी प्रमोद घोलप, नौपाडा अध्यक्षपदी रोहित गोसावी, कळवा पश्चिम अध्यक्षपदी तेजस चंद्रमोरे, कळवा पूर्व अध्यक्षपदी कृष्णा यादव, मुंब्रा अध्यक्षपदी सुजित गुप्ता, कौसा अध्यक्षपदी नाझिया तांबोळी, दिवा अध्यक्षपदी सचिन भोईर यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमध्ये सर्वसमावेशक समाजाचा समावेश करून निवड करण्यात आली. भाजपाच्या ठाणे विभागीय कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात नव्या मंडल अध्यक्षांना सन्मानित करून शुभेच्छा देण्यात आल्या.
भाजपा ठाणे शहर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मंडल अध्यक्षपदी पुरुष कार्यकर्त्यांची निवड केली जात होती. मात्र, यंदा प्रथमच १८ पैकी ३ मंडलांचा कारभार महिलांच्या हाती सोपविण्यात आला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेत वडवली मंडल अध्यक्षपदी ज्योती ठाकूर, राबोडी अध्यक्षपदी विनया भोईर आणि कौसा अध्यक्षपदी नाझिया तांबोळी यांची निवड केली.