डोंबिवली जवळची भोपर टेकडी pudhari news network
ठाणे

ठाणे : भोपर टेकडीचे होणार सुशोभीकरण

कल्याण डोंबिवलीतील 17 मैदानांसह 65 बाग-बगिच्यांचा होणार कायापालट

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली जवळची भोपर टेकडी हे पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. या टेकडीवर पक्षी निरिक्षणासाठी पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात. या टेकडीच्या सुशोभिकरणाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. दरम्यान कल्याण डोंबिवलीत असणार्‍या लहान मोठ्या अशा 17 मैदानांसह 65 बाग-बगीच्यांचा कायापालट करण्यात येणार आहे.

जागतिक तापमानवाढीचा परिणाम भूतलावरील सार्‍या जीवसृष्टीवर होत आहे. प्रचंड उष्णतामान आणि वाढत्या प्रदूषणाला मूठमाती देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण-डोंबिवलीचे फुफ्फुस बळकट करण्याचा विडा उचलला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये लहान-मोठी मिळून सुमारे 65 उद्याने आहेत. तसेच एकूण 17 मैदाने देखील उपलब्ध आहेत. तथापी सद्याच्या असलेल्या जवळपास

20 लाख लोकसंख्येच्या तुलनेत जनसामान्यांसाठी विरंगुळ्याचे महत्वाचे केंद्र मानल्या जाणार्‍या उद्यानांची संख्या वाढविणे जास्त गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेली उद्याने व मैदाने सुसज्ज ठेवणे ही देखील काळाची गरज आहे. या दृष्टीकोनातून अस्तित्वातील मैदाने व उद्याने विद्यार्थी, अबाल-वृद्ध, खेळाडू यांच्यासाठी सुस्थितीत उपलब्ध राहावीत याकरीता महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी यावर्षीच्या अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद उपलब्ध करून दिली आहे.

महापालिकेला गतवर्षी शहर सौंदर्यीकरणांतर्गत 10 कोटी रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. या रक्कमेतून उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने टिटवाळा येथे सुसज्ज उद्यानाचे काम सुरू केले आहे. कल्याण पश्चिमेकडील राणी लक्ष्मीबाई उद्यान, कल्याण पूर्वेकडे असलेल्या खडेगोळवलीतील पद्मश्री डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यान, डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या गजबंधन-पाथर्ली उद्यान, डोंबिवली पश्चिमेतील स्व. मिनाताई ठाकरे उद्यानाचे नुतनीकरणाचे काम देखील हाती घेण्यात येत आहे. आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या संकल्पनेतून आता महापालिका क्षेत्रातील प्रत्येक परिसरात सुसज्ज बाग-बगीचे तयार करण्याचा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचा हा मानस आहे.

मेनिटी टीडीआरच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेकडील बारावे गावात सुसज्ज बगीचा म्हणजे ऑटीजम व्हीलेज तयार करण्यात येत आहे. स्पेशल चाईल्ड म्हणजे विशेष मुलांना उद्यान किंवा मैदानांमध्ये जाऊन खेळता-बागडता येत नाही. अशा विशेष मुलांसाठी या सुसज्ज बगीच्याचे देखील काम प्रगतीप्रथावर असून येत्या 6 ते 8 महिन्यांत हा बगीचा खुला होईल, अशी माहिती महापालिकासूत्रांकडून देण्यात आली.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी उद्यान व मैदानांच्या देखभालीवर लक्ष केंद्रीत केले असून, त्यांच्या निर्देशांनुसार मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांनी कल्याण-डोंबिवलीतील सर्व उद्यानांसह मैदानांची त्रेवार्षीक निविदा काढली असून त्याचे कार्यादेश लवकरच देण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्यानात होणार्‍या किरकोळ दुरुस्त्या, उदाहरणार्थ गेट तुटणे, बगिच्यांची दैनंदिन निगा, बगिचा स्वच्छ ठेवणे, गवत कापणे, आदी कामे नियमीत स्वरूपात बाह्ययंत्रणेद्वारे केली जावून ही मैदाने व बगिचे नियमित सुस्थितीत राहण्यास मदत होणार आहे.

देखभाल दुरुस्ती

उद्यानांमध्ये असलेली खेळणी, तसेच मैदानांमध्ये नागरीकांसाठी, विशेषत: ज्येष्ठांकरिता बनविण्यात आलेल्या व्यायामांची साधने वारंवार तुटण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. तसेच उद्याने आणि मैदानांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांकडून कधी-कधी तक्रारी प्राप्त होतात. परंतु आता देखभाल व दुरुस्तीची त्रैवार्षिक निविदा देखील मंजुरीच्या प्रक्रियेत असल्यामुळे व्यायामाची साधने, ओपन जिम, खेळणी, आदींची निगा, तसेच देखभाल-दुरुस्ती संबंधित ठेकेदारामार्फत राखणे सहज शक्य होईल, अशी माहिती महापालिकेमार्फत देण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT