ठाणे : येत्या ११ ऑक्टोंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३० येथे सिडकोच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन केले जाणार आहे. याच वेळी नवी मुंबई महापालिकेच्या तेरा प्रकल्पांच्या भूमिपूजनासह नऊ प्रकल्पांचे उद्घाटन केले जाणार आहे. सोमवारी (दि.7) याबाबत व्यवस्थापकीय संचालकांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र भवनाचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी अथक परिश्रम घेतले. सिडकोकडून भूखंड मिळविण्यापासून ते प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या दालनात अनेक बैठका घेतल्या. नवी मुंबईत बांधण्यात येणाऱ्या बेसमेंट अधिक तळमजल्यासह १२ मजली महाराष्ट्र भवनाचे अंतिम सादरीकरण तीन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात करण्यात आले. त्यावेळी तातडीने निविदा काढण्याचे निर्देश सिडको व्यवस्थापकीय संचालकांना दिले होते. त्यानुसार सिडकोकडून महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी १२१ कोटी २१ लाख ८४ हजार रुपयांची निविदा काढण्यात आली. असून ७३० दिवसांत म्हणजे सहा वर्षांत भवनाचे काम पूर्ण करण्याचा कालावधी दिला आहे.
आता वाशी येथे महाराष्ट्र भवनची आता भर पडणार आहे. आतापर्यंत नवी मुंबईत सिडकोने १६ राज्यांना भवनासाठी भूखंड दिले असून महाराष्ट्र भवनासाठी एकाही राजकीय पक्षाने सिडकोकडे मागणी केली नव्हती. ही मागणी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी गेल्या दहा वर्षांपासून लावून धरली होती.
महाराष्ट्र भवनाची इमारत १२ मजल्यांची असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आदींचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये शयनगृहाच्या ११ खोल्या, तर दुहेरी बेडच्या ७२, तर अतिथीगृह आणि इतर एकूण १६१ खोल्या असणार आहेत. त्यामुळे कामासाठी, विविध स्पर्धा परीक्षा व नोकरभरतीसाठी कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अशा विविध ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.