Metro File Photo
ठाणे

Metro Extension: ठाणे-भिवंडी-कल्याणमध्ये लवकरच धावणार मेट्रो; ५,२,३ चा मार्ग मोकळा

धामणकर नाका ते दुर्गाडीचा प्रवास होणार सुखकर

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा: ठाणे-भिवंडी-कल्याणचा प्रवास आता मेट्रोने करणे शक्य होणार असून मेट्रो ५ चा विस्तार धामणकर नाका ते दुर्गाडी चौकपर्यंत विस्तारणार आहे. तर ठाण्याची मेट्रो ४ जानेवारी पर्यंत सुरू होणार आहे.

मेट्रो ५ च्या टप्पा २ आणि ३ कामासाठी एमएमआरडीने मंजुरी दिली आहे. त्याच्या निविदाही जाहीर झाल्या आहेत. या मेट्रोच्या नव्या टप्प्यांमुळे कल्याण -भिवंडीला दळणवळणाचे नवे दालन खुल होणार आहे.

ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो ५ मार्गिकेच्या टप्पा २ आणि टप्पा ३ च्या कामासाठी एमएमआरडीएने निविदा जारी केली आहे. त्यामुळे मेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार असलेल्या धामणकर नाका ते दुर्गाडी चौक मेट्रो ५ टप्पा २, दुर्गाडी ते कल्याण मेट्रो ५अ आणि भोईरवाडी ते उल्हासनगर मेट्रो ५अ विस्तारीत मार्ग प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत या मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार आहे.

एमएमआरडीएकडून मेट्रो ५ मार्गिकेच्या टप्पा १ अंतर्गत कापूरबावडी ते धामणकर नाका असा ११.९० किमीच्या मार्गाची उभारणी सुरू असून त्याची १०० टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. आता यंत्रणेची कामे आणि चाचण्या सुरू झाल्या आहेत.

पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. ठाणेकरांच्या विरोधामुळे काहीशी वादग्रस्त ठरलेली ठाणे अंतर्गत मेट्रो मार्गिका आता मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार आहे.

ही मार्गिका वडाळा-कासारवडवली मेट्रो मार्गिका ४ तसेच कापूरबावडी-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५ शी जोडली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काही स्थानकातून प्रवाशांना मेट्रो बदलून मुंबई, भिवंडी आणि कल्याणकडे सहज प्रवास करता येणार असून, ठाणेकरांना शहरांतर्गत प्रवासासोबतच शहराबाहेरील प्रवासासाठीही मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार आहे.

MMRDA ने या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांसाठी निविदा काढली आहे. त्यामुळे धामणकर नाका ते दुर्गाडी, दुर्गाडी ते कल्याण आणि भोईरवाडी ते उल्हासनगर या मार्गांवरील मेट्रोचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

पहिल्या टप्प्यानंतर आता मेट्रो ५ च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात धामणकर नाका ते दुर्गाडी असा १०.४८ किलोमीटरचा मार्ग तयार केला जाईल.

या कामासाठी सुमारे ७,३२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तिसऱ्या टप्प्यात दुर्गाडी ते कल्याण आणि भोईरवाडी ते उल्हासनगर या मार्गांचा समावेश आहे. दुर्गाडी ते कल्याण हा मार्ग ६.५५ किलोमीटरचा, तर भोईरवाडी ते उल्हासनगर हा विस्तारित मार्ग ५.२७ किलोमीटरचा असेल.

काही भागात भूमिगत मेट्रो

या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे धामणकर नाका ते टेमघर या भागात भूमिगत मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. तर राजनोली जंक्शन ते दुर्गाडी चौकदरम्यान दुमजली मार्ग उभारला जाईल. या मार्गावर खालच्या भागात रस्ते वाहतूक आणि वरच्या भागात मेट्रो धावणार आहे.

मेट्रो सुरू झाल्यानंतर ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होण्यास मदत होईल. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी व्हायला हातभार लागेल. त्यामुळे या भागातील नागरिकांचे लक्ष आता मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT