डोंबिवली : सालाबाद प्रमाणे यंदाच्या दिवाळीत डोंबिवलीतील ट्रेक क्षितिज संस्थेने बच्चे कंपनीला भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. दिवाळी सणाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या किल्ले प्रतिकृतींच्या बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन छोट्या दोस्तांनी एकाहून एक सरस किल्ले बांधून इतिहासाच्या पाऊलखुणा जागृत करण्याचा प्रयत्न केला. संस्थेने आयोजित केलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी (दि.9) श्रीगणेश मंदिरातील वक्रतुंड सभागृहात पार पडला.
गेल्या 24 वर्षांपासून ट्रेक क्षितिज संस्था दुर्गसंवर्धन आणि दुर्गभ्रमंती या क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेने 2011 पासून डोंबिवली आणि ठाकुर्ली परिसरात किल्ले बांधणी स्पर्धा सुरू केल्या. सुरूवातीच्या 3 वर्षांत किल्ले बांधणीच्या कार्यशाळा आयोजित केल्या. त्यामुळे किल्ल्याची बांधणी, माहिती, स्वच्छता, इको फ्रेंडली वस्तूंच्या वापरामध्ये घडत असलेले सकारात्मक बदल 13 वर्षांत पहायला मिळाले.
यंदाच्या दिवाळीत स्पर्धकांनी किल्ला बांधायच्या आधी त्या किल्ल्याला प्रत्यक्ष भेट दिली आहे का यावरून त्यांना अधिक गुण देण्याचे संस्थेने परीक्षणात बदल घडवून आणले. मुलांनी गड-किल्ले नुसते न बांधता त्यांनी ते प्रत्यक्ष पाहून अभ्यासावेत, हा त्यामागील उद्देश होता.
या वेळी ट्रेकक्षितिजच्या परीक्षण टीमने डोंबिवली आणि ठाकुर्ली परिसरातील जवळपास 62 किल्ल्यांचे परिक्षण केले. विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी आणि आणि महेंद्र गोवेकर लिखित नकाशातून दुर्ग भ्रमंती या प्रसिद्ध पुस्तकाच्या प्रतींसह किल्ले बांधणीत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना छोटी रोप बॅग भेट म्हणून देण्यात आली. यावेळी स्पर्धेचे समन्वयक गायत्री धर्माधिकारी, सोनाली खापरे यांच्यासह कुशल देवळेकर, तुषार धुरी, संदेश मुठे, स्वप्ना लिमये, गौरव पाध्ये, सचिन पवार, अमोल पोवळे, सौरभ शेट्ये, अलोक गोरे, वल्लरी दामले, वरद राजूरीकर, आदी उपस्थित होते. संस्थेच्या उपक्रमांची माहिती चैतन्य दांडेकर यांनी सादर केली. पुढील ट्रेक संदर्भात माहिती श्रीरंग वैद्य यांनी दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री धर्माधिकारी व शुभम सावंत यांनी केले.
ज्युनिअर ग्रुप (छोटा गट)
हरिहर गड : ओम गडे आणि मित्र मंडळ
सुवर्णदुर्ग : जय भवानी मित्र मंडळ (विवेकानंद सोसायटी )
पद्मदुर्ग : श्री साईनाथ मित्र मंडळ
सीनिअर ग्रुप (मोठा गट)
वेल्लोर किल्ला : स्वराज्य ग्रुप (विवेकानंद सोसायटी)
तोरणा गड : आयरे रोडचा राजा
उदगीर किल्ला : कान्होजी आंग्रे मित्र मंडळ
विशेष पारितोषिक...
लोहगड : स्वराज्य प्रतिष्ठान (किल्ल्यांवरील अतिक्रमण हा ज्वलंत विषय योग्य प्रकारे मांडल्याबद्दल)
प्रतापगड : जाणता राजा (ऑडियो/व्हिडिओ व्हिज्युअल देखावा)
जेजुरी गड : शिवबा ग्रुप (असा गड बांधायचा विचार करणे आणि उत्तम प्रकारे माहिती सांगून तो लोकांसमोर सादर करणे)