Barvi Dam Water Level Pudhari
ठाणे

Barvi Dam Water Level: बारवी धरणात ४८.९० टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षाच्या तुलनेत २१.७७ टक्के घट

ओव्हरफ्लोसाठी ७.८३ मी.गरज

पुढारी वृत्तसेवा

बजरंग वाळुंज

डोंबिवली: ठाणे जिल्हावासियांची तहान भागविणाऱ्या, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या बारवी धरणातील पाण्याचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा समाधानकारक असल्याचे दिसून येत नाही.

शुक्रवारी १० जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या आकडेवारीनुसार धरणाची सध्याची पाणीपातळी ६४.७ मीटर इतकी आहे. धरणाची कमाल ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होण्यासाठी अजून ७.८३ मीटर म्हणजेच सुमारे २५ फूट ८ इंच पाण्याची वाढ होणे आवश्यक आहे.

सध्या धरणात १६५.७१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे जो एकूण क्षमतेच्या ४८.९० टक्के आहे. पावसाबद्दल सांगायचे झाल्यास गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात सरासरी १.४० मिमी इतका अल्प पाऊस नोंदविला गेला.

यंदा १ जून पासून आजपर्यंत धरण परिसरात एकूण १०८४.२० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातील आवकही मंदावली आहे.

गेल्या वर्षी याच दिवशी परिस्थिती बरी होती. त्यावेळी धरणातील पाण्याची पातळी ६८.८ मीटर होती. उपयुक्त पाण्याचा साठा २३९.४९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ७०.६७ टक्के होता.

तसेच गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत धरण परिसरात १५२६.०० मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याच्या पातळीत ४.१ मीटर, पाणी साठ्यात २१.७ टक्के आणि पावसाच्या प्रमाणात ४४१.८० मिमी इतकी घट दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT