डोंबिवली : भला मोठा साप उब घेण्यासह भक्ष्याच्या शोधात चक्क बंगल्यातील देव्हाऱ्यात दडून बसल्याची घटना समोर येताच बंगल्यातील कुटुंबांनी जिवाच्या भीतीने पळ काढला. ही घटना कल्याण पश्चिम भागातील सापर्डे गावात मंगळवार (दि.3) रोजी घडली आहे. या सापाला सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी देव्हाऱ्याच्या कप्प्यातून सुखरूप बाहेर काढून पिशवीत बंद करताच भयभीत झालेल्या कुटूंबाने सुटेकचा निश्वा:स सोडला.
विषारी आणि बिनविषारी साप थंडीच्या दिवसांत उब मिळण्यासह भक्ष्याच्या शोधात मानवीवस्तीत शिरत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतात. मंगळवारी( दि.3) रोजी कल्याण पश्चिमेकडे असलेल्या सापर्डे गावात थळे कुटुंबियांच्या आलिशान बंगल्यात भलामोठा साप शिरला. मात्र साप घरात शिरताना कुणाच्या दृष्टीस पडला नाही. हा साप आधी बेडरूममध्ये व त्यानंतर देव्हाऱ्यातील पूजेच्या वस्तू ठेवण्याच्या कप्प्यात वेटोळे घालून बसला. सकाळी देवपूजा करण्यासाठी गेलेल्यांना साप दिसताच भयभीत झालेल्या सर्वांनी बंगल्याच्या बाहेर पळ काढला.
कुटुंबातील एका सदस्याने पूजा करण्यासाठी देव्हाऱ्यासमोर बसून कप्प्यातील अगरबत्ती काढली. या कप्प्यात वेटोळे घालून बसलेला भला मोठा साप पाहून या सदस्याची भीतीने गाळण उडाली. आरडा-ओरडा केल्यानंतर भयभीत झालेल्या कुटुंबीयांनी बंगल्याबाहेर धूम ठोकली
देव्हाऱ्यात भलामोठा साप असल्याची माहिती इतर सदस्यांना देताच त्यांनाही बाहेर पळ काढला. त्यानंतर बंगल्याचे मालक थळे यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना तात्काळ संपर्क साधून देव्हाऱ्यात साप असल्याची माहिती दिली. सर्पमित्र दत्ता हे घटनास्थळी पोहोचून कप्प्यात दडून बसलेल्या सापाला शिताफीने पकडले आणि पिशवीत बंद केले. साप पडकल्याच पाहून थळे कुटूंबाने सुटेकचा निश्व:स सोडला.
दरम्यान, हा साप धामण जातीचा असून 6 फूट लांबीचा आहे. या सापाची माहिती कल्याण विभागातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यांच्या परवानगीने या सापाला पुन्हा निर्सगाच्या सान्निध्यात सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली. आपल्या परिरात साप दिसल्यास नजीक असलेल्या अग्निशमन दलाच्या कार्यलयात अथवा सर्पमित्रांना तशी तातडीने माहिती दिल्यास पुढील अनर्थ टळू शकतो, असे आवाहन त्यांनी केले आहे.