भिवंडी : बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचार वाढीनंतर भारतात अवैध मार्गाने घुसखोरी करून राहणार्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. गुरुवारी (दि.26) कोनगाव या ठिकाणी तिघा बांगलादेशी महिलांची धरपकड पोलिसांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील कोनगाव येथील दुर्गा अपार्टमेट, धर्मा निवास या इमारतीमध्ये काही बांगलादेशी नागरिक वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाल्यावर कोनगाव पोलिसांनी कारवाई केली असता तेथे शहनाज नजुल्ला शेख, (वय 36 वर्षे), सोनी फिरोज शेख (वय 34 वर्षे), रहीमा शाहीद खान (वय 36 वर्षे) या घरकाम तसेच मजुरी करून गुजराण करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्या जवळ कोणतेही वैध कागदपत्रे न बाळगता भारताच्या सीमेवर घुसखोरी करून अनधिकृतपणे वास्तव्य करताना आढळून आल्या आहेत. या तिघा महिलांना ताब्यात घेऊन कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी शहरात मागील वीस दिवसात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 20 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे.
भिवंडी शहरात सार्वजनिक शौचालय, प्लंबर या कामात त्यासोबत अनेक सायझिंग, डाईंग येथील मजुरी कामात परप्रांतीय काम करीत असून त्यामध्ये बांगलादेशी नागरीक असल्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तर या बांगलादेशी नागरिकांना वास्तव्यासाठी खोल्या भाड्याने देणारे व भारतातील अधिकृत कागदपत्र पुरावा बनवून देणारे शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.