ठाणे : जिल्ह्यातील रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी आरोग्य प्रशासन प्रयत्नशील असताना, आता बदलापूर मधील उपजिल्हा रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. 50 खाटांच्या रुग्णालयाला जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा राज्य सरकारने दिला असून, लवकरच या रुग्णालयाचे रूपांतर 200 खाटामध्ये होणार आहे. अद्यावत उपकरणांनी सुसज्ज असणार्या रुग्णालयात अतिदक्षता विभाग, डिलिव्हरी-सिझर विभाग, अतिदक्षता विभाग, डायलिसिस आदी सोयी सुविधा मिळणार आहेत.
बदलापूरसह आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाच्या असलेल्या बदलापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे रूप लवकरच बदलणार असून ५० खाटांचे हे रुग्णालय आता २०० खाटांचे होणार आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. शस्त्रक्रिया विभागासह विविध आरोग्यांचे तज्ञ, रक्तपेढी यासह इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्याचा लाखो नागरिकांना फायदा होणार आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण अणि दुर्गम भागातील रुग्णांना सरकारी रुग्णालयात खाटांची संख्या कमी असल्यामुळे काहीवेळा धावाधाव करावी लागते. मात्र आता जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढणार आहे. बदलापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण 50 खाटांची सोय आहे. मात्र बदलापूर मधील लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी पडत आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा वाढवून खाटाची संख्या वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांची पासूनची आहे. त्यामुळे राज्य सरकारने या बाबत सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत या रुग्णालयाला जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
50 खाटांची सोय असणार्या या रुग्णालयात आणखी 150 खाटा वाढणार आहेत. ठाण्यातील सिव्हील रुग्णालयाप्रमाणेच येथेही चांगल्या सोयी सुविधा मिळणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन अद्यावत इमारत बांधण्यात येणार असून, डिलिव्हरी-सिझर विभाग, अतिदक्षता विभाग, डायलिसिस, बाह्य विभाग, सर्जरी, आदींसाठी अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असे रुग्णालय होणार आहे.
जिल्ह्यातील सिव्हील रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आदी राज्य शासनाच्या अखत्यारीत असणार्या रुग्णालयात आजच्या तारखेला एकूण 976 खाटा आहेत. मात्र येत्या काही महिन्यात ही संख्या तिपटीने वाढणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी जास्त धावाधाव करावी लागणार नाही. शासनाने उपजिल्हा रुग्णालयाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मान्यता दिली आहे.डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे