डहाणू-रानशेत आश्रमशाळेत विद्यार्थीनीचा जीवनप्रवास थांबविण्याचा प्रयत्न File Photo
ठाणे

ठाणे : डहाणू-रानशेत आश्रमशाळेत विद्यार्थीनीचा जीवनप्रवास थांबविण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

कासा : डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणार्‍या अनुदानित रानशेत आश्रमशाळेत दहावी इयत्तेमध्ये शिकणार्‍या एका 16 वर्षीय विद्यार्थीनीने जीवनप्रवास थांबविण्याचा प्रयत्न केला. रविवारी (दि.1) सकाळी शाळेच्या स्वच्छतागृहामध्येच लोखंडी भालाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विद्यार्थीनीला प्राथमिक उपचारांसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला वलसाड येथे हलवण्यात आले आहे.

आश्रमशाळा रानशेत येथे एका विद्यार्थीनीने जीवनप्रवास थांबविण्याचा प्रयत्न केला असून तिला तत्काळ उपाचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डहाणू प्रकल्पाच्या शिक्षण अधिकार्‍याला शाळेत पाठवून चौकशी केली आहे. याबाबत पुढील माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल.
सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी, डहाणू आदिवासी प्रकल्प

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, दहावी इयत्तेत शिकत असलेली अल्पवयीन विद्यार्थीनी ही रविवारी सकाळी नाष्टा झाल्यानंतर आश्रमशाळेच्या स्वच्छतागृहात गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र ती बराच वेळ होऊ न सुद्धा बाहेर येत नसल्याने तिच्या सहकारी मैत्रिणीने तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने आतून कोणताच प्रतिसाद दिला नाही. विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानंतर आश्रमशाळेतील सुरक्षारक्षकाने धाव घेत दरवाजा उघडला. तेव्हा तिने स्वच्छतागृहाच्या दरवाजाला आतून कडी लावून घेत लोखंडी भालाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. तिला खाली उतरवत बेशुद्ध अवस्थेत प्राथमिक उपचारांसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी वलसाड येथे हलवले.

सदर घटनेनंतर आश्रम शाळा व्यवस्थापन याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत होती. या ठिकाणी इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र निवासी आश्रमशाळेत मुख्यध्यापक, अधीक्षक व अधीक्षिका यांना आश्रम शाळेमध्ये 24 तास राहणे बंधनकारक असताना तिथे कर्मचारी राहत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून नुकतेच जव्हार आदिवासी आश्रमशाळेत एका विदयार्थ्यांनीने अंगावर पेट्रोल टाकून जीवनप्रवास थांबविण्याचा प्रयत्न केला. आश्रम शाळेत विदयार्थ्यांचे समुपदेशन गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रानशेत आश्रम शाळेत रविवारी सकाळीच एका दहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीने बाथरूम मध्ये ओढणीच्या साह्याने गळफास करून जीवनप्रवास थांबविण्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर मी आश्रम शाळेला भेट दिली. मात्र शाळेतील कर्मचारी आणि संबंधित संस्थाचालक यांचे शाळेकडे दुर्लक्ष असल्यानेच हा प्रकार घडला असल्याचे समजते. पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून खबरदारी गरजेचे आहे.
अमित घोडा, माजी आमदार, पालघर विधानसभा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT