ठाणे

ठाणे : ऐन दिवाळीत 90 फुटी रोडला राडा; फटाके फोडण्यावरून तरूणावर हल्ला

backup backup

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : ऐन दिवाळीत फटाके फोडण्यावरून ठाकुर्ली-कल्याण रेल्वे समांतर रस्त्याला असलेल्या 90 फुटी रोडवर राडेबाजी झाली. आमच्या समोर फटाके फोडू नका, अशी तंबी एका तरुणाने दिल्याने संतापलेल्या गटानो मिळून त्या तरुणाला बेदम झोडपून काढले. शिवाय बघून घेतो, असे धमकावून हल्लेखोरांपैकी एकाने फायटरच्या साह्याने या तरुणावर हल्ला चढविला. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी सकरूद्दीन शेख, मिथीलेश लोधी, राजू, रहिम या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. तर बबलू चव्हाण (22) असे जखमी तरूणाचे नाव आहे.

कल्याण पूर्वेतील 90 फिट रोडला रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे. पत्रिपुल परिसरात राहणार बबलू चव्हाण हा पाणी विक्रीचा व्यवसाय करतो. रात्री तो 90 फिट रोडला असलेल्या मोहन सृष्टी इमारतीसमोर मित्र आदिल खान याच्यासोबत उभा होता. त्याच ठिकाणी चार जण आले. त्यांनी सोबत आणलेले फटाके काढून फोडायला सुरूवात केली. रहिवासी परिसर असल्याने फटाक्यांच्या आवाजाने रहिवाशांसह बबलू आणि त्याचा मित्र आदिल यांना त्रास होऊ लागला. तुम्ही आमच्याजवळ फटाके फोडू नका, असे बबलू याने त्या चौघांना बजावले. तू बोलणारा कोण? तुझा या एरियाशी संबंध काय? असा जाब विचारत फटाके फोडणाऱ्या चौघांनी मिळून बबलू याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण तर केलीच, शिवाय तुम्हा दोघांकडे बघून घेतो, अशी धमकी देखील दिली. याच दरम्यान हल्लेखोरांपैकी सकरुद्दीन याने त्याच्याकडील लोखंडी फायटरच्या साह्याने बबलूवर हल्ला चढविला. यात बबलू जबर जखमी झाला. हे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर जखमी बबलूने दिलेल्या जबानीच्या आधारे टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर अद्याप हाती लागले नसून वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

SCROLL FOR NEXT