डोंबिवली : कल्याण सार्वजनिक वाचनालय आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पु. भा. भावे व्याख्यानमालेंतर्गत पु. ल. देशपांडे लिखित असा मी असामी या पुस्तकावर आधारित एकपात्री विनोदी कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाचनालयाच्या सभागृहात हास्यकल्लोळात कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
या पुस्तकातील अनेक गमतीदार प्रसंग, किस्से, लग्नसोहळ्याच्या पारंपरिक पद्धती, उखाणे अशा अनेक भागांचे सादरीकरण मराठी मलिका अभिनेता सुबोध चितळे यांनी केले. व्यक्ती आणि वल्ली या पुलंच्या पुस्तकातील रत्नागिरीचा अंतुबर्वा ते अंतुशेठ या व्यक्तीमत्वाचा जीवनप्रवास, दामूकाका व कोचरेकर मास्तर, आदी व्यक्तिरेखांचे व्यक्तीचित्रण अभिनयातून प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचली. तसेच कोकणातील माणसं तिथल्या फणसासारखीच असतात. पिकल्याशिवाय त्यांच्यातील गोडवा जाणवत नाही अशा पुलंच्या साहित्यातील विविध भावनेने ओतप्रोत असलेले भावबंध जिवंत साकार केले. या प्रसंगी वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर, खजिनदार दिलीप कर्डेकर, कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, अमिता कुकडे, ग्रंथसेविका, वाचकांसह पुलंचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.