ठाणे : आजच्या वेगवान जगात, कामाच्या ठिकाणी येणार्या तणावातून मानसिक आरोग्य विषयक समस्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशावेळी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत विविध प्रकाराचे उपक्रम राबवून मानसिक ताणतणाव विषयी जनजागृती करण्यात येत आहे. कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या अशी थीम यंदा मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे.
तणाव कमी करण्यासाठी ब्रेक घ्या.
क्टिव्हिटी लेव्हल्सची काळजी घ्या.
दररोज व्यायाम करा.
सकस अन्न खा.
पुरेशी झोप घ्या.
मूल्ये आणि कामाचा उद्देश लक्षात ठेवा.
शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, परंतु तरीही तो अनेकदा दुर्लक्षित होतो. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात उद्भवणार्या नव्या युगाच्या आणि जुन्या ज्ञात समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे.यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. ठाणे डॉ. गंगाधर परगे यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा मानसिक कार्यक्रम, ठाणे अंतर्गत शाळा, महाविद्यालये, वृद्धाश्रम, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
हल्ली वाढती बेरोजगारी, राहणीमानाची पध्दती, आर्थिक अडचणी, स्पर्धा सामाजिक तसेच कौटुंबीक समस्या आणि वाढत्या मोबाइल फोनचे व्यसन यामुळे कामाच्या ठिकाणी मानसिक समस्या उद्भवत असल्याचे दिसून आले आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या आज्ञांचे पालन न केल्यामुळे त्यांचे कर्मचार्यांवर चिडणे तसेच त्यांनी रागविल्यास बोचर्या शब्दांमुळे अनेकांना मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते.यातूनच नैराश्य, चिंता, समायोजनाची समस्या, झोपेमध्ये बदल, वजन कमी होणे, अशा मानसिक समस्या उद्भवतात. अशी लक्षणे ताणतणाव उद्भवल्यास जवळच्या व्यक्तीशी व्यक्त व्हा, असा सल्ला या कार्यक्रमातून जनजागृती द्वारे दिला जात आहे.
तणावात असलेल्या व्यक्तीला समुपदेशन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मानसिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी टेली मानस टोल फ्री क्रमांक 14416 हा 24 बाय 7 हेल्पलाइन क्रमांक आरोग्य विभागामार्फत देण्यात आला आहे.