लंपीची लागण pudhari file photo
ठाणे

ठाणे : जनावरांना लंपीची लागण, गोधन संकटात

पुढारी वृत्तसेवा

आसनगाव : शहापूर तालुक्यातील डोहलेपाडा येथे शेतकर्‍याच्या गोधनाला लंपी आजाराची लागण झाली आहे. यामुळे गोधन संकटात आले आहे.

डोहलेपाडा येथील शेतकरी जगदीश डोहळे या शेतकर्‍याच्या गोधनाला लंपी आजाराची लागण झाल्याने लंपी आजाराच्या भीतीने तालुक्यातील दुग्ध व्यवसायिक चिंता व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील डोहलेपाडा येथील शेतकरी हे भात शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत आहेत. गाय, बैल, वासरू यासारख्या जनावरांना विषारी माशा अथवा डासांनी चावा घेतल्यास जनावरांच्या अंगावर गाठी तयार होतात, या गाठी मोठ्या होऊन फुटतात व जनावरांच्या अंगावर जखमा तयार होतात. यातूनच ताप येऊन जनावरे मृत पावतात.

दरम्यान या आजाराला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वास इदे व डॉ. अनिल शिर्के यांनी सांगितले. शहापूर तालुक्यात 2022 ला लंपीची लागण होऊन जवळपास 30 जनावरे मृत पावली होती. मागील वर्षीही या आजाराची जनावरांना लागण झाली होती. मात्र हा आजार लसीकरणातून नियंत्रणात आणण्यात आला होता.

उपाय योजना सुरू असून दरम्यान यावर्षी डोहलेपाडा येथील शेतकर्‍याच्या गोधनाला लंपीची झालेली लागण पाहता, पुन्हा या आजाराने डोके वर काढले असून त्यावर उपाययोजना सुरू आहे.
डॉ. एस. कुलकर्णी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT