ठाणे : गेल्या वर्षी राज्यातील राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने 54 दिवसांचा प्रदीर्घ काळ केलेल्या संपानंतर जानेवारी राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संघटनांना मानधन वाढीचे दिलेल्या आश्वासनाची राज्य शासनाने अद्याप पूर्तता न केल्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सरकारवर नाराज आहेत.
मानधन वाढ, दरमहा पेंशन व ग्रॅच्युइटी देण्याचे शासकीय आदेश निर्गमित करावेत, या मागणीसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने येत्या 23 सप्टेंबरपासून मुंबईत आझाद मैदानावर, शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत अंगणवाडी कर्मचार्यांचे उपोषण व आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
मानधनवाढीसाठी संघटनांनी 4 डिसेंबर ते 25 जानेवारी असा 54 दिवसांचा संप केला. त्यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आशा सेविकांच्या मानधनात वाढ झाली की, राज्यशासनासमोर सेविकांच्याही मानधनवाढीचा प्रस्ताव ठेवण्याचे आश्वासन दिले होते. आशा सेविकांच्या मानधनात सरकारने वाढ केली, पण अंगणवाडी सेविकांच्या संघटनांना दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे. या आश्वासनाची सरकारला आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
शासनाने मानधन वाढीचा शासकीय अध्यादेश जारी केला नाही, तर 25 सप्टेंबर रोजी राज्यातील अंगणवाडी केंद्रे बंद ठेवण्याचा इशाराही कृती समितीने दिला आहे. अंगणवाडी कर्मचार्यांना मानधन वाढ, दरमहा पेन्शन व ग्रॅच्युइटी देण्याचे शासकीय आदेश विनाविलंब निर्गमित करण्यात यावा, या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने पदाधिकारी व अंगणवाडी कर्मचारी बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत.
मुंबई जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी, 23 व 24 सप्टेंबर रोजी या आंदोलनात सहभागी व्हावे, राज्यातील 36 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविकांनी 25 सप्टेंबर रोजी सर्व अंगणवाडी कर्मचार्यांनी, 100 टक्के आझाद मैदानावर होणार्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीचे एम. ए. पाटील, बृजपाल सिंह, राजेश सिंह, सतीश चौधरी भगवान दवणे यांनी केले आहे.