खर्डी स्टेशन-दळखण रोड लगत गेल्या 22 वर्षांपूर्वी केरळ पॅटर्नमध्ये बांधण्यात आलेल्या अंगणवाडीची पूर्णपणे दुरवस्था झाली असून ती कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंगणवाडीच्या पुढील जागेत जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी खेळत असल्याने येथे अनुचित प्रकार घडून नाहक विद्यार्थ्यांचा बळी जाऊ शकतो. यासाठी सदर इमारत तत्काळ पाडण्यात येऊन त्या जागी ग्रामपंचायतीने सभागृह व बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी व्यापारी गाळे बांधून देण्याची गरज आहे.
गेल्या बावीस वर्षांपूर्वी केंद्र सरकारने अंगणवाडीतील मुलांचे थंडी व उन्हाच्या गर्मीपासून संरक्षण व्हावे यासाठी इमारतीवर स्लॅब टाकून त्यावर कौले टाकली व त्यावर पुन्हा स्लॅब टाकून इमारत बांधली होती. परंतु या इमारतीचा एकही दिवस वापर न झाल्याने ती पडून आहे.
सद्या या इमारतीत गर्दुल्ले व दारुडे यांचा राबता असून ह्या इमारतीचा काही भाग कोसळला असून इतर भाग कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने येथे नाहक एखाद्याचा बळी जाऊ शकतो. त्यात साप-विंचूसारखे विषारी श्वापद असल्याने येथे ये-जा करणे धोक्याचे असून ही इमारत पाडण्यात यावी, असा आग्रह स्थानिक रहिवाशी करीत आहेत.
ही इमारत पाडून त्याजागी दोन मजली इमारत बांधून त्यात ग्रामपंचायत सभागृह व व्यापारी गाळे बांधून बेरोजगार तरुणांना रोजगार करण्याची संधी निर्माण करून द्यावी. तसेच खर्डी ग्रामपंचायत कार्यालय 1 किमी वर असल्याने येथील रहिवाशांना ग्रामपंचायतीत त्यांच्या कामासाठी ये-जा करायला दूर पडत असल्याने येथे वॉर्ड क्र. 4 व 5 मध्ये सुविधा केंद्र उघडावे, अशी मागणी जोर धरत आहे. जेणेकरून येथील रहिवाशांना सोयीचे होईल.
सदर इमारत गैरसोयीची असून ती कधीही कोसळू शकते व त्यात नाहक बळी जाऊ शकतो. ही इमारत पाडून तिथे ग्रामपंचायत सुविधा केंद्र, सभागृह व व्यापारी गाळे बांधून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून घ्या.फारूक मेमन, उपजिल्हाप्रमुख, अल्पसंख्याक समिती, ठाकरे गट शिवसेना
सदर इमारत पडकी झाली असून ती पाडण्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया सुरू करून जिल्हा परिषदेने परवानगी दिल्यावर ती इमारत पाडण्यात येऊन त्याठिकाणी, तत्काळ ग्रामपंचायत सभागृह, कार्यालय व व्यापारी गाळे बांधण्यात येतील.मौसीम शेख, उपसरपंच, खर्डी ग्रामपंचायत