अमृत योजनेतील सर्व जलकुंभांचे कामाबाबत पाहणी करताना आमदार राजू पाटील. (छाया : बजरंग वाळूंज)
ठाणे

ठाणे : २७ गावांत अमृत योजना एप्रिल अखेरपर्यंत कार्यान्वित होणार - आमदार राजू पाटील

अमृत योजनेतील सर्व जलकुंभांचे काम एप्रिल २०२५ अखेरपर्यंत पूर्ण होणार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या २७ गावांतील पाण्याची जटील समस्या कायमस्वरूपी संपुष्टात येण्याची केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अमृत योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून ३० ठिकाणी जलकुंभांचे काम सुरू असून दहा-बारा गावांमध्ये ९० टक्के संप पंप स्टोरेजसाठी काम पूर्ण झाले आहे. बाकी इतर ४० ते ४५ टक्के काम बाकी असून तेही प्रगतीपथावर असल्याचे मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी मंगळवारी (दि.8) आयोजित केलेल्या दौऱ्यादरम्यान उपस्थित प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

अमृत योजनेतील सर्व जलकुंभांचे काम एप्रिल २०२५ अखेरपर्यंत पूर्ण होऊन २७ गावांतील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जाईल. त्यामुळे गावांतील नागरिकांना नेहमीच सतावणारा पाणी पुरवठ्याचा ज्वलंत प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

२७ गावांच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी अमृत योजनेचे काम २०१९ पासून सुरू आहे. या योजनेसाठी वाढीव पाणी कोटा मिळावा, यासाठी या भागाचे आमदार राजू पाटील यांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावाही केला. योजनेच काम सुरू करताना जलकुंभांसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक कामे रखडली होती. त्यामुळेच आपण स्वतः पाठपुरावा करून जलकुंभांसाठी जागा उपलब्ध करून घेतल्या आणि रखडलेल्या सर्व जलकुंभांची काम प्रगतीपथावर सुरू केली. मात्र काम सुरू असताना देखील २७ गावांतील जनतेला मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे उपअभियंता शैलेश कुलकर्णी, मनसेचे शहराध्यक्ष राहूल कामत, माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक, आदी पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांसमवेत आमदार राजू पाटील यांनी दावडी, सोनारपाडा, कोळेगाव, संदप, नांदिवली, सांगाव, आदी गावांमध्ये सुरू असलेल्या जलकुंभांच्या कामांचा आढावा घेतला. तसेच ज्या परिसरात सर्वाधिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्या भागात तातडीने पाणी पुरवठा करण्यास प्राधान्य देण्याची सूचना देखील आमदार पाटील यांनी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जलकुंभांसाठी जागा पाहणी करताना मनसेचे नेते तथा आमदार राजू पाटील

२७ गावांमधील हेदुटणे, कोळेगाव, काटई, निळजे, घेसर, संदप, घारीवली, उसरघर, मानपाडा, उंबार्ली, सांगाव, सोनारपाडा, नांदिवली, भोपर, देसलेपाडा, गोळवली, आजदे या गावांमध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून १९ ठिकाणी जलकुंभांचे बांधकाम सुरू आहे. पाहणी दरम्यान ही कामे शक्य तितक्या लवकर आणि दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष म्हणजे प्रत्येक जलकुंभाच्या ठिकाणी जाऊन तांत्रिक माहिती घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील असे आश्वासन दिले होते. तथापी आमदार राजू पाटील यांनी केलेल्या पाहणी दौऱ्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी ८० टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसून येते. संपूर्ण २७ गावांमध्ये ४१९ कोटींचा निधी अमृत योजनेसाठी लागला आहे. १६ टक्के टक्के राज्य सरकार ३३ टक्के केंद्र सरकार आणि ५१ टक्के कल्याण-डोंबिवली महानगरपालिका असा हा पूर्ण महत्त्वकांक्षी अमृत योजनेचा प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून जलकुंभ, संप पंप स्टोरेजसह पाईपलाईन टाकण्याची कामे सद्या २७ गावांमध्ये सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT