डोंबिवली : सार्वजनिक रस्त्यांवर धूम स्टाईलने दुचाक्या उडविणाऱ्या शायनर उडानटप्पूंची मस्ती जिरवण्यासाठी कल्याण परिमंडळ 3 चे उपायुक्त अतुल झेंडे यांनी कठोर कारवाईचे फर्मान सोडले आहे. त्यानुसार पोलिसांनी रात्रीच्या सुमारास कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात भरधाव वेगाने दुचाक्या उडविणाऱ्या, तसेच एका दुचाकीवर तीन-चार जण बसून स्वतःसह रस्त्यावरील अन्य जणांचे जीव धोक्यात घालणाऱ्या 150 हून अधिक उडाणटप्पूंवर दंडात्मक कारवाई तर केलीच, शिवाय या साऱ्यांना कान पकडून उठा-बशा काढायला लावल्या. पोलिसांच्या आक्रमक कारवाईचा दुचाकीस्वारांनी धसका घेतला आहे.
रात्री 9 वाजल्यानंतर ते मध्यरात्रीच्या सुमारास अनेक दुचाकीस्वार आपल्या महागड्या, स्पोर्ट्स, अती वेगाच्या दुचाकी रस्त्यावर काढून कल्याण-डोंबिवलीच्या विविध भागांत विशेषत: ठाकुर्लीतील 90 फुटी रस्ता, कल्याण पूर्वेतील 100 फुटी रस्ता, पुना लिंक रोड, गांधारे पूल ते पडघा रस्ता, टिटवाळा ते वाडेघर बाह्यवळण रस्ता, मोठागाव-माणकोली पुल, डोंबिवलीचा नाका फडके रोडवर सुसाट वेगाने आपल्या दुचाक्या चालवितात. कानाचे पडदे फाटतील असे उरात धडकी भरवणारे आवाज काढत सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषणाचा उच्चांक गाठतात.
अशा दुचाक्या रात्रीच्या सुमारास शांततेचा भंग करत असतात. हॉर्न आणि सायलेन्सरच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांची झोपमोड होते. लहान बाळ, वृद्ध, आजारी, हृदयरोगींना अशा आवाजाचा सर्वाधिक त्रास होतो. मद्यपी, गर्दुल्ले, गांजाडू, नशेखोरांची पुरती जिरवल्यानंतर पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी रात्रीच्या वेळेत धूम स्टाईलने दुचाक्या उडविणाऱ्यांवर कारवाईची झोड घेतली आहे.
गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत स्थानिक पोलिसांनी शहराच्या विविध भागांत रात्रीच्या वेळेत अति वेगाने दुचाक्या चालविणाऱ्या 150 तरूण चालकांवर कारवाई केली. अशा चालकांना पकडून सुरूवातीला 100 उठा-बशा काढायला लावल्या. त्यानंतर या सर्वांवर दंडात्मक कारवाई देखिल केली. या कारवाईनंतर पुन्हा दुचाकीस्वार असे कृत्य करताना आढळला तर त्याला फौजदारी कारवाई करण्याची तंबी दिली जाते. काही जण एका दुचाकीवर तीन ते चार जण बसून हातवारे करत, मोठ्याने गाणी बोंलत रात्रीच्या वेळेत शहराच्या येरझऱ्या मारतात. अशा दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. अशाप्रकारचे मौज करणारे बहुतांशी तरुण अल्पवयीन असल्याचे पोलिसांना आढळले आहे. अशा मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली जात आहे.
रविवारी (दि.5) रात्रीच्या सुमारास कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात पोलिसांनी झाडे-झुडपांचा आधार घेऊन मद्य, चरस, गांजासह अन्य अंमली पदार्थांची तस्कारी आणि सेवन करणाऱ्या जवळपास 60 ते 70 जणांवर कारवाई करण्यात आली. कल्याण पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानक परिसर हा अंमली पदार्थ विक्री आणि नशा करणाऱ्यांचा अड्डा बनला होता. मात्र या भागात स्थानिक पोलिसांनी दररोज कारवाई सुरू केल्याने नशेडी दिसेनासे झाले आहेत.