वाहतूककोेंडी pudhari file photo
ठाणे

ठाणे : प्रशासनाचे नियोजन कोलमडले; गणेशभक्तांचे हाल झाले

पुढारी वृत्तसेवा

महाड : पाच दिवसाच्या गौरी गणपतीचे विसर्जन झाल्याने कोकणातील निम्म्यापेक्षा जास्त गणेश भक्त पुन्हा एकदा आपल्या नोकरी धंद्यासाठी ठाणे पुणे सुरत बडोदा अहमदाबाद या शहरांमध्ये मार्गस्थ होऊ लागले आहेत. गणपतीसाठी कोकणामध्ये आपल्या गावी येताना रायगड जिल्ह्यातील वाहतूक यंत्रणेमधील सावळ्या गोंधळाने विविध ठिकाणी झालेला चक्काजाम हा जिल्हा प्रशासनाच्या कोलमडलेल्या नियोजनाचे प्रतीक असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया या मार्गावरील प्रवासी वर्गातून व गणेश भक्तांकडून ऐकावयास मिळत होत्या.

महाड शहरातील अनेक विभागातून ठाणे पुणे मुंबई येथून आलेले नागरिक वेळेवर घरी पोहोचतील, अशा अपेक्षेने वाट पाहत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांचा मोठा हिरमोड झाल्याचे दिसून आले होते. सकाळी सहा वाजता डोंबिवली ठाणे येथून निघालेल्या नागरिकांना महाड गाठेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते हे लक्षात घेता कोकणात जाण्यासाठी त्या पुढील किमान सहा तासाचा प्रवास म्हणजेच जवळपास 18 तासानंतर या मार्गावरील कोकणात निघालेला गणेशभक्त आपल्या घरी पोहचला होता.

या सर्व प्रकारांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक असलेली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भातील नियोजनाची जबाबदारी पूर्णपणे कोलमडले असेच दिसून आले. यामध्ये एसटी कर्मचार्‍यांकडून घोषित केलेल्या संपाचा देखील मोठा फटका बसल्याचे पहावयास मिळाले. या पुढील काळात परतीचा प्रवास सुरू होणार असून त्यावेळी तरी आजच्या प्रमाणेच अवजड वाहनांना बंदी व विविध डेपोमध्ये मेंटेनन्सची यांत्रिकी पथक सज्ज करण्याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाने एसटी प्रशासनाला द्यावेत अशी अपेक्षा या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार किमान 12 ते 15,000 पेक्षा जास्त वाहने या काळादरम्यान कोकणामध्ये गेली असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या मार्गांवरील पेट्रोल पंप व संबंधित यंत्रणेवर अतिरिक्त ताण येणार असल्याचे स्पष्ट झाले असून आगामी काळात याबाबतही जिल्हा प्रशासनाने याची नोंद ठेवावी असा सल्ला नागरिकांकडून शासनाला देण्यात येत आहे. यासाठी निदान पुढील वर्षापर्यंत तरी रखडलेल्या मुंबई -गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. हा महामार्ग पूर्णत्वास गेल्यास नेहमी उद्भवणारी वाहतूक कोंडीची समस्या कायमची मिटणार आहे.

अनेक वाहने नादुरुस्त

मोठ्या प्रमाणावर एसटीच्या गाड्या या मार्गावर सीएनजी संपल्याने, ब्रेकडाऊन झाल्याने उभ्या राहिल्या कारणाने वाहतुकीचा खोळंबा झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या प्रति वर्षाप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून गणेशभक्तांसाठी उभारण्यात आलेल्या व्यवस्थेबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असतानाच सीएनजी पंप तसेच ब्रेकडाऊन झालेल्या गाड्या संदर्भात एसटी व खाजगी यंत्रणांकडून व्यवस्था करण्यात आली असती तर या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास वेळ लागला नसता अशा सूचना या बारा ते अठरा तासाच्या प्रवासानंतर नागरिकांनी केल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT