डोंबिवली : मकरसंक्रातीनिमित्त बाजारात पतंग आणि मांजा विक्रीची झुंबड उडाली आहे. तथापी हा आनंद घेत असताना नायलाॅन मांजा, चिनी, प्लास्टिक कृत्रिम मांजा यांचा वापर पतंग उडविण्यासाठी करू नये, असे शासनाने आदेश दिले आहेत. तरीही काही दुकानदार चोरी-छुपे अशाप्रकारचे प्रतिबंधित घातक मांजा विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशांनुसार स्थानिक पोलिसांनी पतंग आणि मांजा विक्रीच्या दुकानांवर छापे टाकून सहा दुकानदारांवर चीनी, नायलाॅज मांजा विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
चिनी बनावटीचे घातक, प्लास्टिक, नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या कल्याणातील कोळसेवाडी, बाजारपेठ, महात्मा फुले चौक आणि डोंबिवलीतील विष्णूनगर या चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रत्येकी एक आणि कल्याणमधील खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.
चिनी, नायलाॅन मांजा वापरावर शासनाची बंदी आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत या प्रतिबंधित मांजाची विक्री करण्याचा प्रयत्न दुकानदारांनी करू नये. दुकानात लपून-छपून प्रतिबंधित चिनी, नायलाॅन मांजा विक्रीचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्यांच्यावर केडीएमसी आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मकरसंक्रांतीनिमित्त मंगळवारी कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण परिसरात उत्सवी नागरिक, तरूण आणि तरूणींकडून मोठ्या प्रमाणात पतंग उडविली जाण्याची शक्यता असल्याने पोलिस आणि केडीएमसीनेही त्यादृष्टीने काळजी घेतली आहे. पतंंगोत्सवाचा आनंद घेत असताना घातक चिनी, प्लास्टिक, नायलाॅन मांजाचा वापर कुणी करू नये यादृष्टीने विशेष काळजी घेण्याच्या सूचना पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंंबिवलीतील पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी आपल्या हद्दीतील पतंग आणि मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर छापे टाकून त्या दुकानांमध्ये प्रतिबंधित नायलाॅन मांजा विकला जाऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. यापूर्वी हेच घातक मांजा झाडांमध्ये अडकून त्याचा फास मान आणि पायाला लागून पक्षी घायाळ होण्याच्या वा त्यांच्या मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा तर मांजाचा दुचाकीस्वारांच्या गळ्याला फास बसून त्यांना गंभीर दुखापती झाल्याचे प्रकार घडले आहेत.
पतंग उडविण्याचा आनंंद लुटण्यासाठी प्रतिबंधित चिनी, नायलाॅन, प्लास्टिक मांजा या घातक मांजाचा वापर करू नये. या मांजांमुळे झाडावरील पक्षी वा दुचाकीस्वारांना गंभीर दुखापती होतात. याच मांज्यामुळे गंभीर दुर्घटना घडल्याची शक्यता विचारात घेऊन वरिष्ठांच्या आदेशांनुसार घातक प्रतिबंधित मांजाची विक्री, साठाच नव्हे तर अगदी वापरकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले.
कल्याण परिमंडळ - 3 मधील मोकळी मैदानी, निर्जनस्थळे आणि रस्त्यांवरील हातगाड्या, ठेले, ढाबे यांच्यावर पोलिसांतर्फे कारवायांचा धडाका सुरूच आहे. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री विहित वेळेपेक्षा सुरू असलेल्या एकूण 30 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. तसेच उघड्यावर व निर्जस्थळी एकूण 54 नशेखोरांवर कारवाई करण्यात आली. आशा एकूण 84 जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच सार्वजनिक रस्त्यावर धूम स्टाईलने दुचाक्या उडविणाऱ्यांसह ट्रिपलसीट दुचाकी चालविणाऱ्या 148 जणांवर करवाया करण्यात आल्या. अशा प्रकारे एकूण 232 कारवाया कल्याणमध्ये करण्यात आल्या. कारवायांची मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.