डोंबिवली : तरूणी, महिलांसह निरागस बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी नशिल्या पदार्थांच्या आहारी गेलेल्या नशेडींना वठणीवर आणण्यासाठी कारवायांची झोड उठवली आहे. कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी तर लागोपाठ चौथ्या दिवशी अर्थात शनिवारी रात्री सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्या तब्बल 170 नशेडींच्या विरोधात दारूबंदी अधीनियमासह फौजदारीच्या 7 कायद्यांचा वापर करून या साऱ्यांची झिंग उतरवली आहे.
कल्याण पोलिस परिमंडळ 3 च्या हद्दीत कल्याणातील बाजारपेठ, खडकपाडा, कोळसेवाडी, महात्मा फुले चौक, तर डोंबिवलीतील रामनगर, विष्णूनगर, टिळकनगर आणि मानपाडा अशी एकूण 8 पोलिस ठाणी आहेत. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 12 वर्षीय बालिकेच्या अपहरण, अत्याचार आणि खूनानंतर पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यातच वाढती गुन्हेगारी आणि ख्रिसमसपासून अगदी इंग्रजी नववर्ष स्वागच्या थर्टी फर्स्टची रात्र गाजविणाऱ्या नशेखोरांना आता पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.
सार्वजनिक ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा, शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात रात्री बिनकामाचे फिरणाऱ्या निशाचरांसह नशेखोरांना लगाम घालण्यासाठी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कंबर कसली आहे. शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून डीसीपी अतुल झेंडे यांच्यासह आठही पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल 170 नशोखोरांची धरपकड केली. एकाच वेळी सुरू केलेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तडाख्यात सापडलेल्यांना पोलिस ठाण्यात आणून या सर्वांना शंभर उठा-बश्या काढायला लावल्या.
महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 33 (डब्ल्यू) 131, 112, 117, 102, 117 अन्वये 66, दारूबंदी कायदा अधिनियम 65 (ई) 68 अन्वये 12, अंमली पदार्थ विरोधी कायदा 8 (क) 27 अन्वये 8, तर बीएनएस 285, 287 अन्वये 14, अशा एकूण 170 नाशेखोरांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. शिवाय या साऱ्यांना शंभर उठा-बश्या काढायला लावल्या. एकीकडे अशा पद्धतीने ॲक्शन मोडवर आल्याने समस्त पालकवर्गांसह विशेषतः महिलांनी प्रशंसा केली आहे. तर दुसरीकडे फौजदारी कारवाईच्या बडग्यामुळे नशेखोर अस्वस्थ झाले आहेत.
पोलिसांच्या सिंघम कारवाईचे मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी स्वागत केले आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमांवर पोलिसी कारवाईचा व्हिडियो प्रसारित केला आहे. कल्याण-डोंबिवलीमधील नशेखोरांसाठी पोलिसांचा सिंघम अवतार पहायला मिळाला. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंबिवली स्थानक आणि सभोवतालच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी गर्दा-चरस-गांजा ओढणाऱ्या नशेखोरांना चांगलाच चोप देत त्यांची भर रस्त्यात धिंड काढल्याबद्दल मनसेचे नेते राजू पाटील यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
कारवाई दरम्यान सापडलेल्यांमध्ये बहुतांश नशेखोर अमराठी आहेत. यातून पोलिस खात्यानेही बोध घेणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता अंमली पदार्थ विरोधी पथकाला अधिक बळ देणे ही काळाची गरज आहे. आज अनेक ठिकाणी मग त्या झोपडपट्ट्या असोत की उच्चभ्रू वस्त्या, सगळीकडेच अंमली पदार्थांचे सेवन केलेले तरूण झिंगताना दिसत आहेत. डीसीपी अतुल झेंडे यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशीच कारवाई सातत्याने व्हावी, अशी आशा आहे. अशा कारवायांमुळे समाजकंटक वठणीवर येऊन महिला, मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मदत होईल व समाजविघातक कृत्यांना आळा बसेल, असा विश्वास राजू पाटील यांनी व्यक्त केला.