डोंबिवली : कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील रिक्षाचालक प्रस्तावित भाड्यापेक्षा जादा भाडे आकारत असतील, तसेच प्रवाशांशी उध्दट वागत असल्यास अशा रिक्षावाल्यांच्या विरोधात ऑन द स्पॉट तक्रार करा, असे आवाहन आरटीओने केले आहे.
तक्रारी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कल्याण कार्यालयाने प्रवाशांसाठी 94234 48824 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील काही रिक्षाचालक मनमानी करून प्रवाशांकडून प्रस्तावित भाड्यापेक्षा अधिकचे भाडे आकारत आहेत. अनेक रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारत आहेत. प्रवाशांशी भाडे घेण्यावरून वाद घालत आहेत. एका रिक्षात तीन प्रवासी घेऊन जाण्यास मुभा असताना काही रिक्षाचालक मागच्या सीटवर तीन आणि चालकाच्या दोन्ही बाजूला दोन अशा पध्दतीने 5 प्रवासी बसवून शेअर पध्दतीने प्रवासी वाहतूक करत आहेत. या पध्दतीमुळे प्रवाशांनाही त्रास होत आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कल्याण कार्यालयाकडे प्रवाशांकडून येत आहेत.
या तक्रारींचे तात्काळ निराकरण करता यावे, प्रवाशांना बसल्या जागी रिक्षाचालकांबद्दल तक्रार आरटीओ अधिकाऱ्यांना करता यावी या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आशुतोष बारकुल यांनी 94234 48824 हा विशेष सुविधा क्रमांक प्रवाशांना उपलब्ध करून दिला आहे. अनेक रिक्षाचालक स्टँड सोडून रेल्वेच्या प्रवेशद्वारांसमोर रिक्षा उभ्या करून बेकायदा प्रवासी वाहतूक करत आहेत. बहुतांशी चालक आरटीओच्या नियमाप्रमाणे सफेद वा खाकी गणवेश परिधान करत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
डोंबिवली पूर्वेत काही दिवसांपूर्वी शहीद भगतसिंग मार्गावर काँक्रीटचे काम करण्यात आले. या कामासाठी रिक्षावाल्यांना चार रस्त्यावरून वळसा घेऊन दावडी, रिजन्सी, गोळवली, आदी भागात जावे लागत होते. या वळशामुळे रिक्षावाल्यांनी प्रवाशांकडून वाढीव पाच ते दहा रूपये आकारण्यास सुरूवात केली. आता शहीद भगतसिंग मार्ग सुरळीत सुरू झाला आहे. तरीही रिक्षावाल्यांनी वाढविलेली भाडेवाढ अद्याप कमी केली नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी त्रस्त प्रवाशांकडून करण्यात येत आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोनदा कल्याण-डोंबिवली परिसरातील रिक्षावाल्यांची गनिमीकावा पद्धतीने तपासणी करावी. तसे केल्यास बेशिस्त रिक्षावाल्यांवर अंकुश लागेल. स्टँडवर तासन् तास थांबून प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रामाणिक रिक्षावाल्यांवर अन्याय होणार नाही, अशीही मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
रिक्षा चालकांसंदर्भात प्रवाशांची काही तक्रार असेल तर ती प्रवाशांना आहे. त्या घटनास्थळावरून तात्काळ करता यावी यासाठी विशेष सुविधा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. 94234 48824 या क्रमांकावरून प्रवाशांनी संबंधित रिक्षाचालकांबद्दल तक्रार केल्यास त्याची गंभीर दखल आरटीओ कार्यालयाकडून घेतली जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी सांगितले.