मिरा रोड : विरार पोलीस ठाणे हद्दीत व इतर ठिकाणी घरफोडी करुन चाकुचा धाक दाखवुन जबरी चोरी करणार्या पारधी टोळीतील कुख्यात आरोपीला 21 वर्षानंतर जालना येथुन मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.
विरार पूर्वेला, आगाशी येथे चार अज्ञात आरोपींनी 9 जानेवारी 2003 रोजी सुहास पाटोळे यांना चाकूचा धाक दाखवून घरफोडी केली होती. यामध्ये 1,33,20 किंमतीचे सोन्याचे दागिने व 25,000 रोख रक्कम असा माल जबरीने चोरुन नेला. तसेच बाजुच्या अंतोन डाबरे यांच्या घराचे खिडकीचे ग्रील तोडुन त्यांना मारहाण करुन जबरी चोरीचा प्रयत्न केला. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुध्द विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्हयाच्या तपासात आरोपी सुचिनाथ ऊर्फ राजेश सत्यवान पवार याला 2005 मध्ये अटक करून त्याच्या विरुध्द दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. परंतु या गुन्हयातील फरार आरोपी बबर्या व श्याम काळे यांचा शोध पोलीस घेत होते. हे आरोपी 21 वर्षांपासून फरार होते. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आरोपी काळे याला अटक केली आहे.