डोंबिवली : खोणी-तळोजा मार्गावर चालकाने निष्काळजीपणाने ट्रेलर चालवून अचानक हा ट्रेलर रस्त्यावर थांबविला. इतक्यात पाठीमागून भरधाव वेगात येणारा दुचाकीस्वार ट्रेलरवर आदळला. या धडकेत दुचाकीला आग लागून दुचाकीस्वार आगीत होरपळून मरण पावला. खोणी-तळोजा मार्गावरील उसाटण्या जवळ मंगळवार (दि.4) रोजी घडली. राजेश राम (30) असे होरपळून मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
या प्रकरणी मृत राजेशचा सहकारी ओकील राम याच्या फिर्यादीवरून हिललाईन पोलिसांनी ट्रेलरच्या बेजबाबदार चालकाविरूध्द भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. अंबरनाथ येथे राहणारे राजेश राम आणि ओकील राम हे एका कंपनीत काम करतात. हे दोघे तळोजा येथील आपल्या पर्यवेक्षकाकडे दुचाकीवरून रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ येथून खोणी-तळोजा मार्गावरून जात होते. उसाटण्याच्या दिशेने बबलू ढाब्यासमोरून जात असताना त्यांच्या समोर एक ट्रेलर धावत होता. इतक्यात अचानक चालकाने निष्काळजीपणाने आणि हयगयीने ट्रेलर रस्त्याच्या मध्यभागी थांबवला. भरधाव वेगात असलेला ट्रेलर अचानक थांबल्याने दुचाकीस्वार राजेश राम आणि पाठीमागील कामगार दुचाकीसह ट्रेलरला जाऊन धडकले. तात्काळ दुचाकीला आग लागली. दुचाकीवर मागे बसलेला ओकील राम बाजूला फेकला गेला. दुचाकीला लागलेल्या आगीत दुचाकीस्वार राजेश राम होरपळला. हे पाहून ढाबा चालकांनी पाईपने पाणी मारून दुचाकीला लागलेली आग विझवली.
ही माहिती हिललाईन पोलिसांना देण्यात आली. जखमी राजेश राम यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात नेण्यात आले. तथापी तेथील डाॅक्टरांनी होरपळलेल्या राजेश राम याला मृत घोषित केले. अलीकडे डम्पर, मिक्सर, हायवा चालक भरधाव वेगात वाहने चालवित असल्याने या वाहनांमुळे शहर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जागोजागी रस्त्यांवर शहर आणि वाहतूक पोलिस तैनात केले आहेत. मात्र तरीही अनेक चालक त्यांच्या ताब्यातील वाहने बेफिकीरपणे चालवून स्वतः सह इतरांचेही जीव धोक्यात घालत असल्याच्या घटना घडत आहेत.