खानिवडे (ठाणे) : वसई पूर्वेतून जाणाऱ्या मुंबई-दिल्ली महामार्गावरील पेल्हार व सोपारा फाटा दरम्यान असलेल्या मुंबई वाहिनीवरील स्नेह पेट्रोल पंपाच्या समोर झालेल्या भीषण अपघात बाप व लेकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
रिक्षातून जाणारे वडील शहजाद उस्मानी (५०) व त्यांचा मुलगा अतिक उस्मानी (२२) हे दोघे येथील सेवा रस्त्यावरून महामार्गावर येण्यासाठी मुंबई वाहिनीवर येणाऱ्या भरधाव गाड्या पास होऊन जाण्याची वाट पाहत होते. तर रिक्षांच्या पुढच्या बाजूस त्याच प्रकारे नवशाद खान हा दुचाकी चालक सुद्धा गाड्या पास होण्याची वाट पाहत होता. याचवेळी मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या एम एच १२ यु एम ९७७७क्रमांकाच्या अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकने प्रथम उभ्या असलेल्या रिक्षाला व रिक्षा पुढे उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक देऊन फरफटत नेत अक्षरशः चिरडले. यामध्ये दुचाकी चालक दूर फेकला गेला. पण त्याचे प्राण वाचले आहे. मात्र रिक्षातून प्रवास करणारा चालक व त्याचा मुलगा चेंबलेल्या रिक्षातच गतप्राण झाले. ही धडक इतकी जोरदार होती की रिक्षाची स्थिती ही पाहण्यापलीकडे झाली होती. याच वेळी पावसाची देखील रिपरिप सुरू झाली.
दरम्यान याच उड्डाणपुलांवर एक मोठा टँकर पुलाखालील रस्त्यावर कोसळून खालून जाणाऱ्या कारवर आदळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. महामार्गावरील या अपघाती घटनास्थळापासून मागे पेल्हार पोलीस ठाण्यापर्यंत तर पुढे वसई फाट्यापर्यंत असलेल्या सेवा रस्त्यांवर मोठमोठ्या गाड्या नेहमीच दिवसभर रांगेत पार्किंग करून ठेवलेल्या असतात. तर उड्डाणपूल संपल्यानंतर महामार्गावर येण्याच्या रस्त्यावर सुद्धा अनेक वाहने गुजरात मुंबई कडे जाणाऱ्या लक्झरी बसेस रस्ता अडवून उभ्या केल्या जातात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण मुख्य महामार्गावर येणाऱ्या चालकांना महामार्गावरील धावणारी भरधाव वेगातील वाहने दिसत नसल्याने नेहमीच छोटे मोठे अपघात होतात. यासाठी या भागातील अवैध पार्किंगचा मुद्दा देखील हा अपघात पाहण्याऱ्यांनी उपस्थित केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.