डोंबिवलीजवळच्या कोळेगावातून प्रेमीयुगुलांचे अपहरण Pudhari File Photo
ठाणे

ठाणे : डोंबिवलीजवळच्या कोळेगावातून प्रेमीयुगुलांचे अपहरण; प्रियकराला रिक्षातून फेकले

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : मनाविरूध्द का वागतेस? आपणास पसंत नसलेल्या तरूणावर प्रेम का करतेस? त्याच्या बरोबर का फिरतेस? या प्रश्नांची सरबत्ती करूनही प्रतिसाद दिला नाही म्हणून दोघा जणांनी डोंबिवली जवळच्या कोळेगावातील एका घरातून प्रियकर-प्रेयसीला जबरदस्तीने रिक्षात कोंबले. या तरूणीला नवी मुंबईत नेऊन तेथे लोखंडी सळईने बेदम झोडपले. या मारहाणीत अपहृत तरूणीच्या हाता-पायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तर तिच्या प्रियकराला देखिल बेदम झोडपून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासचक्रांना वेग दिला आहे.

बबलू मंडल आणि 50 वर्षाचा त्याचा एक साथीदार अशी आरोपींची नावे आहे. बबलू मंडल हा नवी मुंबईतील ग्रीनपार्क झोपडपट्टीत राहतो. शुक्रवारी (दि.23) हा प्रकार कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगावात असलेल्या सचिन रसाळ यांच्या चाळीत घडला आहे. पूजा असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरूणीचे नाव असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर तिचा प्रियकर उमेश (रा. गोवंडी, मुंबई) यालाही दोन जणांनी बेदम मारहाण करून त्याला मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरूणी पूजा आणि तिचा मित्र उमेश यांचे प्रेमसंबंध असून दोघांनी संमतीने लग्न करण्याचे निश्चित केले आहे. लग्नापूर्वी पूजा आणि उमेश हे कोळेगावातील सचिन रसाळ यांच्या चाळीत राहत असल्याची माहिती कळताच बबलू मंडल हा त्याच्या साथीदारासह नवी मुंबईतून कोळेगावात आला. त्याने पुजाला घराबाहेर बोलविले. तू उमेश बरोबर प्रेमसंबंध का ठेवतेस, असा सवाल केला. यावेळी दोन्ही बदमाशांनी पूजासह उमेशला देखिल बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघांना जबरदस्तीने रिक्षात बसण्यास सांगितले. त्याला पूजा आणि उमेशने प्रतिकार केला. रिक्षात बसले नाहीत तर जीव घेईन, अशी अपहरणकर्त्यांनी धमकी दिली. धमकीला घाबरून दोघेही रिक्षात बसल्यानंतर ही रिक्षा शिळफाटा भागात नेली. तेथे बबलू मंडल याने प्रियकर उमेश याला रिक्षातून बाहेर फेकले. अपहरणकर्त्या बबलू मंडल याने पूजाला स्वत: राहत असलेल्या ग्रीनपार्क झोपडपट्टीतील घरी नेले. तेथे तिला घरात डांबून लाथा-बुक्क्यांनी तर मारहाण केलीच, शिवाय लोखंडी सळईने बेदम झोडपून काढले. या मारहाणीत पूजाच्या हाता-पायांना गंभीर दुखापती झाल्या. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून पुजाने थेट मानपाडा पोलिस ठाणे गाठले. स्वतःवर बेतलेला कठीण प्रसंग तिने पोलिसांसमोर कथन केला. पोलिसांनी पुजाच्या जबानीवरून बबलू मंडल आणि त्याच्या साथीदाराविरूध्द गुन्हा दाखल केला.

आरोपींचा शोध सुरू

बबलूने उमेशला यालाही जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिल्याचे पूजाने पोलिसांना सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत फडोळ आणि त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. अपहरणकर्ता आणि त्याचा साथीदार अद्याप हाती लागला नसून पोलिस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT