डोंबिवली : विविध संकल्पनांनी शिक्षण क्षेत्राला नवे आयाम प्राप्त करून देणारे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ अशोक प्रधान यांचे कल्याणात त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभना, मुलगा समीर, मुलगी सोनाली आणि प्रणाली असा परिवार आहे.
गेल्याच महिन्यात १६ सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. मुंबईतील रूपारेल महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून अशोक प्रधान यांच्या कामाची सुरूवात झाली. आपल्या उत्कृष्ट कामाच्या बळावर याच महाविद्यालयामध्ये त्यांनी प्राचार्य पदही भूषविले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात उप कुलगुरू आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कुलगुरूपद भुषवताना त्यांनी केलेल्या कामाची शिक्षण क्षेत्रात आजही प्रशंसा केली जाते. त्याच बरोबर त्यांनी सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य बँक अशी ओळख असलेल्या कल्याण जनता सहकारी बँकेत संचालक, कल्याण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, अशी विविध पदेही त्यांनी सक्षमपणे भूषवली. कल्याणातील विविध शिक्षण तसेच सहकारी क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान कुणीही विसरू शकणार नाही. त्यांच्या निधनाने कल्याणातील सर्वच स्तरांतील व्यक्तींकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर कल्याणातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.