उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एका महिला पोलीसावर ब्लेडने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात महिला पोलीस गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शीतल बामळे असे हल्ला झालेल्या महिला पोलीसाचे नाव आहे.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सकाळच्या सुमारास बाबासाहेब सोनवणे हा पत्नी विरोधात तक्रार करण्यासाठी आला होता. मात्र काही वेळाने तो ब्लेड घेऊन आला आणि त्याने आपल्या स्वतःवरच ब्लेडने वार केले. पोलीस ठाण्याच्या डायरी रूम मध्ये काम करत असलेल्या पोलीस कर्मचारी शितल बामळे यांच्यावरही ब्लेडने चार-पाच वार केले. या हल्ल्यात महिला पोलीस शितल बामळे यांच्या डोक्यावर, मानेवर आणि गालावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
घटनेनंतर तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि दारुड्या आरोपी बाबासाहेब सोनावणे याला ताब्यात घेतले. जखमी महिला पोलिसाला तात्काळ उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दारुड्याला तात्काळ अटक करण्यात आली असून, त्याच्यावर हत्येचा प्रयत्न आणि शासकीय कर्मचार्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. आरोपीवर कडक कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात महिला कर्मचार्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.